राहुरीतील शिक्षिकेला मंत्र्यांच्या अमेरिकेतील बहिणींकडून इंग्रजीची शिकवणी

विलास कुलकर्णी
Thursday, 7 January 2021

चार महिन्यांच्या कोर्सनंतर विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी त्यांची ज्ञानकक्षा विस्तारली. या कोर्समुळे "माणुसकी जपणारी माणसे" भेटल्याचे त्यांनी 'सकाळ' शी बोलताना सांगितले.

राहुरी : गुहा येथील एका शिक्षिकेची अमेरिकेतील ग्लोबल नगरी फाउंडेशनतर्फे मोफत इंग्रजीच्या कोर्ससाठी निवड झाली. त्यांना थेट अमेरिकेतून ऑनलाइन शिक्षिका लाभल्या राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या ज्येष्ठ भगिनी डॉ. वृषाली जाधव. त्यामुळे सुसंस्कृत तनपुरे कुटुंबाशी अनोखे नाते जुळले.

चार महिन्यांच्या कोर्सनंतर विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी त्यांची ज्ञानकक्षा विस्तारली. या कोर्समुळे "माणुसकी जपणारी माणसे" भेटल्याचे त्यांनी 'सकाळ' शी बोलताना सांगितले.

क्रांती पंडितराव करजगीकर (प्राथमिक शिक्षिका, गुहा जिल्हा परिषद शाळा) असे त्यांचे नाव आहे. त्यांनी कोर्समध्ये इंग्रजीचे व्याकरण, वाचन, संभाषण, निबंध लेखन कौशल्य आत्मसात केले. नगर जिल्ह्यातील विदेशात वास्तव्य केलेल्या व्यक्तींनी मायभूमीच्या विकासासाठी फाउंडेशनची स्थापना केली. त्याद्वारे विधायक उपक्रम राबविले जातात. 

करजीकर म्हणाल्या, 15 ऑगस्ट 2020 रोजी अमेरिकेतून एक व्हॉट्सॲप कॉल आला. "अभिनंदन. इंग्रजी प्रशिक्षणासाठी तुमची निवड झाली." मी घाबरले. फोन ठेऊन दिला. तेवढ्यात, डॉ. उषा तनपुरे यांचा फोन आला.

"माझी मुलगी वृषाली अमेरिकेत असते. तुमची ग्लोबल नगरीच्या इंग्लिश कोर्ससाठी निवड झाली आहे. वृषाली तुमची टीचर आहे. तिचा फोन उचला." मनात शंकांचे काहूर माजले. मुख्याध्यापक संपत सोनवणे यांनी प्रोत्साहन दिले. भीतभीत वृषाली यांचा फोन घेतला. त्यांनी "मला मॅडम नको. दीदी म्हणा. असे सांगून पहिल्याच संवादात मन जिंकले. अभ्यासक्रम समजवला. आत्मविश्वास द्विगुणित झाला."

हेही वाचा - जिल्हाधिकारी डॉ. भोसले वाढविणार महापालिकेचे उत्पन्न

"कामातील प्रामाणिकपणा, होमवर्क, वेळेचे महत्व अशा अनेक गोष्टी दिदींनी शिकविल्या. जिवाभावाच्या मैत्रीण झाल्या. घरातील एक व्यक्ती वाटायला लागल्या. दिदींनी जीव ओतून शिकविले. माझे इंग्रजी सुधारण्यासाठी खूप परिश्रम घेतले.

19 डिसेंबरला अंतिम परिक्षा संपली. हुरहूर लागली. दीदी भेटणार नाहीत. त्यांचा फोन आला. सरप्राईज गिफ्ट पाठवले आहे. माझा मुलगा आणायला गेला. धावतच आला. "आई बघ तुझ्या अमेरिकेतल्या टीचर दीदीने डॉमिनोज्मधून आपल्याला विविध पदार्थांचे पार्सल पाठवले." दीदीला फोन केला. त्या म्हणाल्या, "परीक्षा संपली. एन्जॉय करा. पार्टी टाईम. बाकी उद्या बोलूया." 

"थोड्यावेळाने मंत्री प्राजक्त तनपुरे यांचा फोन आला. काय बोलावे सुचेना. शिक्षिकेला मंत्र्यांचा फोन येतो. माझ्यासाठी खूप मोलाची गोष्ट होती. त्यांनी विचारले "दीदीने मला कसे शिकवले? काय शिकवले? कोर्सचा कितपत फायदा झाला? प्रशिक्षणाचा उपयोग विद्यार्थ्यांसाठी कसा करेल?" माझ्या कुटुंबाची, शाळेची आस्थेने चौकशी केली. शाळेसाठी मदत लागली, तर करण्याचे आश्वासन दिले."

अमेरिकीतील दीदी अन मंत्री भाऊ

"अमेरिकेतील उच्च शिक्षित मंत्रीमहोदयांचा साधेपणा. विचारांची उंची. मदत करण्याची वृत्ती. बहिणीबद्दल कौतुक. नम्रतेचा अनमोल अलंकार. समोरील व्यक्तीला सन्मान देऊन, संवाद साधण्याची हातोटी. शाळा, शिक्षकांबद्दल विशेष आस्था. त्यांच्या बोलण्यातून, कृतीतून व्यक्त झाली. संवादातून त्यांच्याबद्दल आदर द्विगुणित झाला. दीदींसोबत प्राजक्तदादा माझेही भाऊ आहेत. असे वाटले." अहमदनगर

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teachings from the American sisters of the ministers to the teacher in Rahuri