उंबरी बाळापूर शिवारातील वाळूसाठ्यामुळे दहा लाखांचा दंड

सकाळ वृत्तसेवा
Friday, 11 December 2020

हा साठा निरुपयोगी असल्याचा पंचनामा तलाठी, सरपंचांनी केला आहे. मात्र, चुकीच्या माहितीच्या आधारे ही कारवाई केल्याचा आरोप उंबरकर यांनी केला आहे. 

संगमनेर ः उंबरी बाळापूर शिवारात 20-25 ब्रास वाळूसाठा आढळून आल्याबद्दल पंचायत समितीचे माजी विरोधी पक्षनेते सरूनाथ उंबरकर यांना महसूल विभागाने 10 लाख एक हजार रुपये दंडाची नोटीस बजावली आहे. अपर तहसीलदार स्वाती दाभाडे व पथकाने ही कारवाई केली. 

दरम्यान, महसूल विभागाने कारवाई केलेला वाळूसाठा सुमारे 13 वर्षांपूर्वीचा आहे. त्या वेळी रीतसर परवाना घेऊन स्वामित्वधनाची (रॉयल्टी) रक्कम भरलेली आहे. त्यावर काटेरी झुडपे-झाडे उगवली आहेत. वाळूचोरी व भ्रष्ट कारभारावर आवाज उठविल्याने आपल्यावर सूडबुद्धीने ही कारवाई केल्याचा आरोप उंबरकर यांनी केला आहे. 

उंबरी बाळापूर शिवारात मोठ्या प्रमाणात वाळूउपसा करण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांना पाठविलेल्या निनावी पत्रात देण्यात आली होती. त्यानुसार, अपर तहसीलदार दाभाडे यांनी 27 नोव्हेंबर रोजी संबंधित ठिकाणी जाऊन कारवाई केली.

या बाबत उंबरकर यांनी तातडीने लेखी खुलासा केला. त्यानुसार, 2006मध्ये परवाना घेऊन वाळूसाठा केला होता. कालांतराने ही वाळू खराब होऊन त्यावर झाडे-झुडपे उगवली.

हा साठा निरुपयोगी असल्याचा पंचनामा तलाठी, सरपंचांनी केला आहे. मात्र, चुकीच्या माहितीच्या आधारे ही कारवाई केल्याचा आरोप उंबरकर यांनी केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ten lakh fine for sand in Umbri Balapur Shivara