कोरोना ः नगरने ओलांडला दहा हजारांचा आकडा, मार्चमध्ये होता एक

दौलत झावरे
Monday, 10 August 2020

मागील आठवड्यात कोरोनाबाधितांची संख्या रोज पाचशेच्या पुढे निघत होती. मात्र रविवारपासून हा आकडा पाचशेच्या आत आला असून आज (सोमवारी) दिवसभरात एकूण 359 जण पॉझिटिव्ह आढळून आले.

नगर ः जिल्ह्यात मार्च महिन्यात पहिला कोरोनाबाधित रूग्ण सापडला होता. आणि सहाच महिन्यात हा आकडा तब्बल दहा हजारांवर गेला आहे. जिल्ह्यात एकूण 10 हजार 82 रुग्ण झाले आहेत. त्यातील सहा हजार 647 जण बरे होऊन घरी परतले. सध्या 3323 जणांवर उपचार सुरू अाहे. एकूण 112 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

मागील आठवड्यात कोरोनाबाधितांची संख्या रोज पाचशेच्या पुढे निघत होती. मात्र रविवारपासून हा आकडा पाचशेच्या आत आला असून आज (सोमवारी) दिवसभरात एकूण 359 जण पॉझिटिव्ह आढळून आले.

यामध्ये जिल्हा रुग्णालयातील टेस्ट लॅबमध्ये 41, अँटिजेन चाचणीत 165 तर खासगी प्रयोगशाळेत 153 जण पॉझिटिव्ह आढळले. दिवसभरात सहा जणांचा मृत्यू झाल्याने मृत्यूच्या आकडा 112 झालेला आहे. 
दुपारी जिल्हा रुग्णालयाच्या लॅबमधील अहवालामध्ये एकूण 41 जण बाधित आढळून आले. यामध्ये महापालिका हद्दीत 21, नगर ग्रामीणमध्ये सात, कॅन्टोन्मेंटमध्ये चार, पारनेरमध्ये पाच, जामखेडमध्ये एक व मिलिटरी हॉस्पिटलमध्ये तीन रुग्ण सापडले. 

हेही वाचा - कलेक्टर-भाजप नेत्यांमध्ये धुसफूस

अँटिजेन चाचणीमध्ये 165 जण बाधित आढळून आले. यामध्ये महापालिका हद्दीत एक, संगमनेरमध्ये 26, राहात्यात 15, पाथर्डीत 29, नगर ग्रामीणमध्ये 13, श्रीरामपूरमध्ये दहा, श्रीगोंद्यात 14, पारनेरमध्ये पाच, अकोल्यात तीन, राहुरीत नऊ, कोपरगावमध्ये आठ, जामखेडमध्ये दहा व कर्जतमध्ये 22 रुग्ण सापडले. 

खासगी प्रयोगशाळेतील अहवालांमध्ये 153 जण बाधित आढळून आले. यामध्ये महापालिका हद्दीत 112, संगमनेरमध्ये तीन, पाथर्डीत सहा, नगर ग्रामीणमध्ये आठ, श्रीरामपूरमध्ये आठ, नेवाशात तीन, श्रीगोंद्यात दोन, पारनेरमध्ये एक, राहुरीत एक व कर्जतमध्ये सहा रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. 

 
397 जण बरे होऊन घरी परतले 
जिल्ह्यातील 397 जण घरी परतल्याने जिल्ह्याचा रुग्ण बरे होण्याचा आकडा आजअखेर 6647 एवढा झाला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 68.08 टक्के झाले आहे. आज (सोमवारी) घरी परतलेल्यांमध्ये महापालिका हद्दीतील 195, संगमनेर 29, राहाता चार, पाथर्डी चार, नगर ग्रामीण अकरा, श्रीरामपूर एक, कॅन्टोन्मेंट हद्दीतील तीन, नेवाशातील अकरा, श्रीगोंद्यातील 20, पारनेरमधील 36, अकोल्यातील 14, शेवगावमधील 29, कोपरगावमधील 26, जामखेडमधील सहा, कर्जतमधील सहा, मिलिटरी हॉस्पिटलमधील एका जणाचा समावेश आहे. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ten thousand corona-affected in the Nagar district, one in March