
मुलीवर अत्याचार करणाऱ्यास दहा वर्षांची सक्तमजुरी
अहमदनगर - अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नाना लक्ष्मण शिंदे (वय ३५, रा. भिंगारदिवे मळा, सावेडी) याला १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एच. मोरे यांनी ठोठावली. विशेष सरकारी वकील अॅड. मनीषा केळगंद्रे-शिंदे यांनी सरकारतर्फे काम पाहिले.
अहमदनगर शहरात राहणारी पीडित अल्पवयीन मुलगी शिवणक्लासला जाण्यासाठी घरातून बाहेर पडली. मात्र, संध्याकाळपर्यंत परत न आल्याने तिच्या कुटुंबीयांनी शोध घेतला. त्यानंतर फिर्यादीने त्यांच्या पुतणीकडे विश्वासात घेऊन चौकशी केली असता, तिने पीडित मुलगी नाना शिंदेबरोबर प्रवीण भावड्या वाकळे (रा. सावेडी गाव) याच्या मदतीने निघून गेल्याचे सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
पीडित मुलगी व नाना शिंदे यांना शिराळ चिचोंडी (पाथर्डी) येथे सोडल्याचे समजले. तेथून संबंधितांना ताब्यात घेतले. पीडितेच्या जबाबानुसार अत्याचार, तसेच लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२ चे कलम ३ व ४ प्रमाणे कलम लावले.
या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक संजयकुमार सोने, सहायक पोलिस निरीक्षक आर. एन. पिंगळे, पोलिस अंमलदार जी. ए. केदार यांनी करून न्यायालयामध्ये आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षातर्फे १३ साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षाचा युक्तिवाद व आलेला पुरावा ग्राह्य धरून आरोपी नाना शिंदे यास न्यायालयाने शिक्षा ठोठावली.
हे साक्षीदार ठरले महत्त्वाचे
फिर्यादी, अल्पवयीन पीडित मुलीची साक्ष, पीडितेची चुलत बहीण, साक्षीदार ड्रायव्हर, पंच साक्षीदार, तपासी अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, तसेच पीडित मुलगी शिक्षण घेत असलेल्या शाळेचे मुख्याध्यापक यांच्या साक्षी नोंदविल्या. महिला अंमलदार उत्कर्षा वडते यांनी या खटल्यामध्ये पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.
Web Title: Ten Years Servitude For Abusing A Girl Ahmednagar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..