esakal | बाजार समित्यांची कुलपे उघडली, आत येणाऱ्यांची अँटीजेन चाचणी
sakal

बोलून बातमी शोधा

बाजार समिती

बाजार समित्यांची कुलपे उघडली, आत येणाऱ्यांची अँटीजेन चाचणी

sakal_logo
By
गोरक्षनाथ बांदल

नगर ः जिल्ह्यातील नेप्ती (ता. नगर) उपबाजार समिती, संगमनेर येथील वडगाव पान उपबाजार व राहुरी, राहाता, कोपरगाव, श्रीरामपूर, श्रीगोंदे या बाजार समित्यांच्या मुख्य आवारामध्ये फळे व भाजीपाल्याचे (कांदा वगळून) व्यवहार बुधवारपासून (ता. 26) सकाळी सात ते सकाळी 11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र भोसले यांनी परवानगी दिली आहे.

कोरोनाचा प्रसार होणार नाही, यासाठी काळजी घेण्याचे बंधन बाजार समित्यांवर लादण्यात आले आहे. (The market committee in Nagar district will start from today)

बाजार समिती, उपबाजार समितीतील सर्व व्यापारी, त्यातील नोकर, हमाल, मापाडी व कामगार यांची आरटीपीसीआर/ रॅपिड अँटिजेन चाचणी बाजार समितीने करावी. त्यास अनुसरून पास देण्याबाबतची कार्यवाही बाजार समिती, उपबाजार समितीने करावी. संबंधित बाजार समितीने पुरेसा पोलिस बंदोबस्त उपलब्ध करून घ्यावा आणि आवश्‍यक त्या नियमांचे पालन न करणाऱ्या संबंधितांवर दंडात्मक कारवाई करावी.

हेही वाचा: तमाशा सम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचे निधन

मास्क असल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीस बाजार समिती आवारात प्रवेश देऊ नये. एका वाहनासोबत वाहनचालक व केवळ एका शेतकऱ्यास प्रवेश दिला जाणार आहे. बाजार समितीत प्रवेश करण्यापूर्वी वाहनचालक व सोबतची व्यक्ती यांची थर्मामीटर व पल्स ऑक्‍सिमीटरद्वारे तपासणी करण्याची व्यवस्था बाजार समितीने करावी.

प्रवेशद्वारावर हॅंड सॅनिटायझर आणि मास्कची व्यवस्था करावी. रिटेल, सर्वसामान्य ग्राहकांना बाजार समिती आवारात प्रवेश देता येणार नाही. व्यवहाराकरिता दिलेली मुदत संपल्यानंतर वेळोवेळी बाजार समिती आवार निर्जंतुक करण्याची जबाबदारी संबंधित बाजार समितीची राहील, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

बाजार समितीमध्ये समन्वयक म्हणून संबंधित तालुक्‍यांचे उपनिबंधक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यावर संबंधित बाजार समितीत सामाजिक अंतर आणि कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन होण्याची खातरजमा करण्याची जबाबदारी असेल. बाजार समितीच्या आवारात जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या अटी व शर्तींचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्यास बाजार समिती बंद करण्यात येईल. येत्या 31 मेपर्यंत हा आदेश लागू राहणार आहे.(The market committee in Nagar district will start from today)