esakal | कर्जत पोलिसांची ग्रामसुरक्षा यंत्रणा कोरोना काळात ठरतेय प्रभावी

बोलून बातमी शोधा

चंद्रशेखर यादव, कर्जत

कर्जत पोलिसांची ग्रामसुरक्षा यंत्रणा कोरोना काळात ठरतेय प्रभावी

sakal_logo
By
नीलेश दिवटे

कर्जत : गुन्हेगारीला आळा घालण्याबरोबरच तालुक्यातील प्रत्येक प्रशासकीय विभागाच्या कामकाजात मदत होऊन नागरिकांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी कर्जत पोलिसांकडुन कार्यान्वित करण्यात आलेली 'ग्रामसुरक्षा यंत्रणा' तालुक्यासाठी वरदान ठरत आहे. विशेष म्हणजे कोरोना मदतकार्यातही या यंत्रणेचे मोठे योगदान मिळत आहे.

लोकहिताचा हेतू व नागरिकांच्या अडचणी तात्काळ सोडवण्यासाठी ही यंत्रणा सुरू करण्याबाबत येथील पोलिस स्टेशनच्या वतीने ही संकल्पना मांडण्यात आली होती. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव आदींनी यास दुजोरा दिला. आमदार रोहित पवारांनी पुढाकार घेत यासाठी पत्रव्यवहार केला.

ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी येथील पोलिसांनी परिश्रम घेत अनेक प्रात्यक्षिके घेतली तसेच सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना व नागरीकांना सहभागी करून घेत कार्यशाळा घेतल्या. आता पोलिस यंत्रणेबरोबरच सर्वच विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडुन या यंत्रणेचा प्रभावीपणे वापर करण्यात येत आहे. नागरिकांचे प्रश्न जलदगतीने सुटत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यशासन व जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सुचना व माहिती याच ग्रामसुरक्षा यंत्रणेमार्फत एकाच फोनकॉलवर नागरीकांपर्यंत तात्काळ पोहचत आहेत. गुन्हेगारी व अनुचित घटना रोखण्यास मदत होत आहे.

मागील काही दिवसांपूर्वी तालुक्यातील चांदे बुद्रुक येथे आग लागली होती आणि तेथील प्रतिनिधींच्या एकाच कॉलवर ७० ते ८० ग्रामस्थ काही वेळातच घटनास्थळी जमले व आग आटोक्यात आणली त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. कोरोना काळात सध्या पंचायत समिती, नगरपंचायत सक्षमपणे या यंत्रणेचा वापर करीत लसीकरण, कोरोना चाचण्या, पाणी, घनकचरा, पाणीपट्टी, घरपट्टी आदींची माहिती नागरिकांना देत आहेत. येथील पोलीस यंत्रणेने राबवलेल्या या उपक्रमाचा मोठा फायदा प्रशासनाला आणि नागरिकांना होत आहे. सर्व नागरीकही प्रशासनाच्या कामात सहभागी होऊन त्यांना मदत करताना दिसत आहेत.

❝ सर्वसामान्यांना कोणतीही अडचण आली तर त्यांना तात्काळ मदत मिळेल यासाठी हा प्रामाणिक प्रयत्न आहे. चुकीच्या घटना, महिलांवर होणारा अन्यायही रोखता येईल. कर्जतबरोबरच जामखेडसाठी देखील ही प्रणाली राबवण्यात येईल. अशा अनेक योजना मतदारसंघासाठी आपण नव्याने करणार आहोत ❞

-आ.रोहित पवार,कर्जत-जामखेड

❝ नागरिकांच्या मदतीसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. प्रत्येक कुटुंबातील दोन सदस्यांनी आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी करून या यंत्रणेत सहभागी व्हायचे आहे. कोणत्याही अडचणीच्या वेळी संपर्कात राहता येईल आणि प्रशासनाच्या सर्व सूचनांची माहिती याद्वारे नागरिकांना मिळेल. ❞

- चंद्रशेखर यादव, पोलिस निरीक्षक,कर्जत