esakal | चोरटे शिरजोर; पोलिस कमजोर; पोलिसांच्या तपासाबाबत प्रश्‍नचिन्ह, चोऱ्यांचे सत्र सुरूच
sakal

बोलून बातमी शोधा

Theft increased in Shrigonda taluka

श्रीगोंदे तालुक्‍यात महिनाभरापासून चोऱ्यांचे सत्र सुरू असून, चोरट्यांच्या टोळीने लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. मात्र, ही टोळी अद्याप पोलिसांच्या हाती लागली नसून, तपास जैसे-थेच आहे.

चोरटे शिरजोर; पोलिस कमजोर; पोलिसांच्या तपासाबाबत प्रश्‍नचिन्ह, चोऱ्यांचे सत्र सुरूच

sakal_logo
By
संजय आ. काटे

श्रीगोंदे (अहमदनगर) : तालुक्‍यात महिनाभरापासून चोऱ्यांचे सत्र सुरू असून, चोरट्यांच्या टोळीने लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. मात्र, ही टोळी अद्याप पोलिसांच्या हाती लागली नसून, तपास जैसे-थेच आहे. 

हिरडगाव येथील भास्कर भुजबळ यांच्या घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी गेल्या महिन्यात सात लाख रुपयांचा मुद्देमाल लुटला होता. त्याचा तपास सुरू असतानाच टाकळी लोणार येथील शरद कानगुडे यांच्या घरातून 40 हजार रुपये व घरासमोरील दुचाकी पळविली होती. या घटनेदरम्यान चोरीची दुचाकी पोलिसांना आढळून आली. चोरीच्या दुचाकीच्या आधारे पोलिस चोरांपर्यंत पोहोचतील, अशी ग्रामस्थांना आशा होती. मात्र, पोलिसांना तपासात विशेष प्रगती करता आली नाही. तपासादरम्यान हिरडगाव आणि टाकळी लोणार येथील चोरीची पद्धत एकच असल्याचे स्पष्ट झाले. 

चोरीच्या घटनांबाबत पोलिस माहितीची जमवाजमव करत असतानाच चोरांनी पुन्हा एकदा आपली मोहीम फत्ते केली. गेल्या आठवड्यात तांदळी दुमाला येथील वंदना भागवत यांच्या घरातून चोरांनी साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल लांबविला. या घटनेदरम्यान चोरट्यांनी इतर ठिकाणीही चोरीचा प्रयत्न केला, मात्र त्यात यश आले नाही. 

या तिन्ही गुन्ह्यांतील चोरटे एकच असण्याची शक्‍यता आहे. अशा पद्धतीचे गुन्हे करणारी नवीन टोळी तयार झाल्याने पोलिसांना अद्याप त्यांच्यापर्यंत पोहोचता आलेले नाही. 
यात चोरी करताना दुचाकीचा वापर होत असल्याने श्वानपथकाचा उपयोग होताना दिसत नाही. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत चोरांची छबी कैद झाली असली, तरी तपासात प्रगती नाही.

पोलिस निरीक्षक दौलत जाधव यांनी वाढत्या चोऱ्या लक्षात घेऊन, पोलिस यंत्रणा अधिक सक्रिय केली असली, तरी रात्रगस्तीला मर्यादा येतात. श्रीगोंदे पोलिसांनी आढळगाव येथे तीन ठिकाणी झालेल्या चोऱ्यांचा जसा छडा लावला, त्याच पद्धतीने या तिन्ही चोऱ्यांचा तपास लावण्याची गरज व्यक्त होत आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर