नगरमध्ये मृताच्या टाळूवरचे खाल्ले लोणी! सिव्हिलमधून कोरोनाबाधिताचे दागिने लंपास

अशोक निंबाळकर
Monday, 28 September 2020

मृत कोरोना पेशंट नातेवाईकाने तोफखाना पोलिसांकडे केलेल्या तक्रारीमुळे हा प्रकार समोर आला आहे. संबंधित व्यक्तीच्या नातेवाईकाचा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये १८ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला.

नगर ः गेल्या काही दिवसांपासून नगर शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. समूह संसर्ग झाल्याने सर्वसामान्यांची पाचावर धारण बसली आहे. आरोग्य सेवेचेही तीनतेरा वाजले आहेत. अॉक्सीजन बेड मिळवण्यासाठी नव्हे तर कोरोनाबाधितांची मृत्यूनंतरही परवड थांबत नाही.

अमरधाममध्येही वेटिंग लिस्ट आहे. अशा या महामारीत काही कोरोना योद्धे जिवाची पर्वा न करता पेशंटसाठी सेवा देत आहेत. मात्र, दुसरीकडे मृताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार सुरू आहे. काही खासगी हॉस्पिटलमध्ये लूट होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये अधूनमधून झडत असते. त्यात किती तथ्य हे आरोग्य समितीच जाणो. परंतु सिव्हिल रूग्णालयात घडलेला प्रकार किळसवाणाही आणि चीड आणणारा आहे.

मृत कोरोना पेशंट नातेवाईकाने तोफखाना पोलिसांकडे केलेल्या तक्रारीमुळे हा प्रकार समोर आला आहे. संबंधित व्यक्तीच्या नातेवाईकाचा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये १८ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. त्या रूग्णाच्या अंगावर सोन्याचे दागिने होते. ते दागिने कोणीतरी काढून घेतले आहेत. तशी फिर्याद संबंधिताने तोफखाना पोलिसांत दिली आहे. त्या अनुषंगाने तोफखाना पोलिसांनी सिव्हिल हॉस्पिटलकडे सीसीटीव्ही फुटेज मागितले आहे.

या प्रकारामुळे पुन्हा एकदा सिव्हिलच्या आरोग्य यंत्रणेविषयी प्रश्न निर्माण झाला आहे. मागे एकदा कोरोना मृतांचा खच झालेली अॅम्ब्युलन्स अमरधाममध्ये नेण्यात आली होती. तेव्हा एकावर एक मृतदेह रचले होते. याबाबत नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी मोबाईलद्वारे चित्रीकरण करून ते व्हारयल केले होते. पेशंटच्या दागिन्यांबाबत अनेक वदंता होत्या. परंतु या तक्रारीमुळे त्या खऱ्या वाटू लागल्या आहेत.

या बाबत जिल्हा रूग्णालय प्रशासनासोबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु तो होऊ शकला नाही.

 

या प्रकाराबाबत सिव्हिल प्रशासन चौकशी करीत आहे. संबंधित विभागातील मेट्रनच्या म्हणण्यानुसार त्या रूग्णांचे दागिने नातेवाईकांकडे दिले होते. परंतु नातेवाईक म्हणतात, ते आम्हाला मिळालेले नाहीत. त्या विभागात सीसीटीव्ही आहेत. ते फुटेज तपासल्यानंतर खरा काय प्रकार आहे, तो समोर येईलच. स्टाफमधील कोणी दोषी आढळल्यास त्याला कारवाईस सामोरे जावे लागेल.

- सुनील पोखरणा, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्कसक, सिव्हिल, नगर.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Theft of jewelry from Corona patient's body