संगमनेरमध्ये इतक्या इमारती आहेत धोकादायक, दोन संकुलाचाही समावेश

आनंद गायकवाड
Saturday, 12 September 2020

संगमनेर शहरातील नवीन नगर रस्त्याकडेला असलेले तीन दशकांपूर्वीचे नगरपरिषदेचे साथी भास्करराव दुर्वे नाना व्यापारी संकुल या वास्तूला नगरपरिषदेने धोकादायक वास्तू घोषीत केले आहे. 

संगमनेर ः संगमनेर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून असलेल्या दुमजली व्यापारी संकुलाच्या दोन इमारतींमधील 34 गाळ्यांसह, शहराच्या विविध प्रभागातील 27 खासगी इमारती धोकादायक घोषित केल्या आहेत.

संगमनेर शहरातील नवीन नगर रस्त्याकडेला असलेले तीन दशकांपूर्वीचे नगरपरिषदेचे साथी भास्करराव दुर्वे नाना व्यापारी संकुल या वास्तूला नगरपरिषदेने धोकादायक वास्तू घोषीत केले आहे. 

या व्यापारी संकुलातील सर्व भोगवटाधारकांना तीन दिवसात गाळे रिकामे करण्याचा आदेश बजावला असून, कुचराई केल्यास कायदेशिर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे लाखो रुपये खर्चून पोटभाडेकरु म्हणून राहिलेल्या व्यावसायीकांसह मुळ मालकांचे धाबे दणाणले आहेत.

हेही वाचा - आदिवासी महिला प्रसूतीला येताच नर्स बसली लपून, दंवडी देऊनही निघेना बाहेर

नियमानुसार तीस वर्षापूर्वीच्या इमारतींचे शासकिय संस्थेमार्फत स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येते. त्यानुसार या वर्षी फेब्रुवारी महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालकीच्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. त्यानुसार पुण्यातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर नगरपरिषदेच्या मालकीच्या विविध इमारतींसह अन्य शासकीय इमारतींचेही ऑडिट करण्यात आले. त्यातून नवीन रस्त्यावरील साथी भास्करराव दुर्वेनाना व्यापारी संकुल धोकादायक असल्याचा अहवाल व त्यावरील कारवाईबाबतच्या सूचनाही नगरपरिषदेच्या प्रशासनाला देण्यात आल्या होत्या.

या नंतर 11 मार्च रोजी संबंधित गाळेधारकांना नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. त्याकडे दुर्लक्ष झाल्याने पुन्हा नव्याने नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. या धोकादायक वास्तुमुळे अपघात होण्याची भिती निर्माण झाल्याचे सांगत, नैसर्गिक संकटात इमारत कोसळून जीवित अथवा वित्त हानी झाल्यास त्याची जबाबदारीही भोगवटादारांवर राहणार आहे.

नगरपरिषदेने जुन्या व्यापारी पेठेतील वाडे, घरे आदींची पहाणी करुन पडझड झालेल्या, मोडकळीला आलेल्या 27 इमारतींना धोकादायक घोषित केले आहे. 

महामार्ग प्राधिकरणासह अनेक जागरुक संगमनेरकरांनी या व्यापारी संकुलाकडे बेकायदेशीर म्हणून बोट दाखवले आहे. नैसर्गिक प्रवाह असलेल्या शहरातील मोठ्या लेंडीनाल्याचे पात्र संकुचित करुन त्यावर हे संकुल बांधले गेले आहे. त्यामुळे मुसळधार पावसात हा नाला तुंबून नवीन रस्त्यासह बसस्थानकाच्या समोरील भागात गुडघाभर पाणी साचते.

संपादन - अशोक निंबाळकर
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There are 27 dangerous buildings in Sangamner