राज्यात आता दोनच झोन, अहमदनगर नॉन रेड झोनमध्ये, लॉकडाउन चारचे हे आहेत नियम

There are now only two zones in the state, Ahmednagar non-red zone, lockdown four
There are now only two zones in the state, Ahmednagar non-red zone, lockdown four

नगर: कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यातील मार्गदर्शक सूचना आज शासनाने जाहीर केल्या असून त्यामध्ये रेड झोन आणि नॉन रेड झोन असे दोन भाग केले आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिकेसह मुंबई महानगर प्रदेश परिसरातील सर्व महापालिका, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला आणि अमरावती या महापालिकांचे क्षेत्र ‘रेड झोन’ म्हणून जाहीर करण्यात आले आहेत तर त्याव्यरिक्त उर्वरित भाग हा ‘नॉन रेड झोन’ म्हणून घोषित केला आहे. पावसाळ्यापूर्वीची कामे, देखभाल, निगा आणि दुरुस्तीसाठी ‘रेड झोन’मध्ये दुकाने, मॉल, आस्थापना, उद्योग येथे सकाळी ९ ते सायंकाळी पाचपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. 

या ठिकाणी कुठलेही वाणिज्यिक व्यवहार केले जाणार नाहीत. मात्र ‘नॉन रेड झोन’मध्ये बाजारपेठा, दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी पाचपर्यंत उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.  जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.  या मार्गदर्शक सूचनांव्यतिरिक कुठल्याही जिल्हा अथवा महापालिका प्रशासनाला मुख्य सचिवांच्या मान्यतेशिवाय स्वतंत्र आदेश काढता येणार नाहीत. आज जाहीर करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना दि. २२ मे पासून राज्यात लागू होणार आहेत. 

*लॉकडाऊन ४.० मध्ये खालील बाबींना कायमस्वरूपी बंदी असेल-*

● आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विमानवाहतूक यांना बंदी. तथापि वैद्यकीय सेवा तसेच अपवादात्मक परिस्थितील हवाई सेवा आणि इतर आवश्यकता वाटल्यास वैदयकीय सेवांना परवानगी असेल.
● मेट्रो सेवा पूर्णपणे बंद.
● शाळा, महाविद्यालये, शिक्षण संस्था, प्रशिक्षण देणाऱ्या संस्था विविध वर्ग (क्लासेस) यांना बंदी. ऑनलाईन/ ई- लर्निंग शिक्षणाला उत्तेजन देण्यात येईल.
● ज्या हॉटेलमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी/ पोलीस/ शासकीय अधिकारी/ आरोग्य कर्मचारी/ काही कारणास्तव अडकली आहेत अशांसाठी तसेच यात्रेकरू आणि अलगीकरण व्यवस्था यांच्यासाठी सुरू राहतील. त्याशिवाय ठराविक बस डेपो, रेल्वे स्थानके आणि  एअरपोर्ट येथील कॅन्टीन व्यवस्था सुरू राहील. याव्यतिरिक्त बाकी सर्व उपहारगृहे आणि हॉटेल्स बंद राहतील. मात्र उपाहारगृहातील घरपोच व्यवस्था सुरु राहील.
● सर्व चित्रपटगृहे, शॉपिंग मॉल्स, व्यायामशाळा, क्रीडा संकुल, तरणतलाव, करमणूक संकुले, नाट्यगृहे, बार आणि ऑडिटोरियम, हॉल यांना पूर्पपणे बंदी.
● सामाजिक, राजकीय, खेळ, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक सण आणि कार्यक्रम आयोजित करण्यावर बंदी.
● सर्व धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे यांना बंदी. धार्मिक कारणासाठी एकत्र येण्यावर बंदी.
● कोविड-19 च्या व्यवस्थापनासाठी निर्धारित केलेल्या राष्ट्रीय मार्गदर्शक सूचना व तरतुदी राज्यभरात कायम राहतील.

*रात्रीची संचारबंदी*

● अत्यावश्यक सेवा वगळता रात्री 7 ते सकाळी 7 वाजता या दरम्यान संचारबंदी असेल. स्थानिक प्रशासन यासंदर्भात सीआरपीसीचे कलम 144  आणि इतर नियमांनुसार आदेश जारी करुन याची कडक अंमलबजावणी करेल.
ज्येष्ठ नागरिक, बालकांची सुरक्षा
● 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला आणि 10  वर्षाखालील मुले यांनी अत्यावश्यक किंवा वैद्यकीय  कारण वगळता घरातच थांबणे आवश्यक आहे.

*भारत सरकारचे निकष, उपलब्ध आरोग्य सुविधा आणि इतर आवश्यक घटक लक्षात घेऊन राज्यातील बाधित क्षेत्र पुढीलप्रमाणे सुनिश्चित करण्यात येत आहे-*
● *रेड झोन्स –* मुंबई महापालिकेसह एमएमआर क्षेत्रातील सर्व महापालिका. पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला आणि अमरावती महापालिका.
● *रेड झोन नसलेले क्षेत्र (ऑरेंज आणि ग्रीन झोन) –* राज्यातील उर्वरित क्षेत्र

*कंटेनमेंट झोन्स –*
● केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना लक्षात घेऊन संबंधीत महापालिका किंवा जिल्हा प्रशासन हे त्यांच्या भागातील रेड झोन, नॉन रेड झोन तसेच कंटेनमेंट झोन निश्चित करतील. महापालिका क्षेत्रात आयुक्त आणि जिल्ह्याच्या उर्वरित भागात जिल्हाधिकारी यांना कंटेनमेंट झोन निश्चित करण्याचे अधिकार देण्यात येत आहेत. निवासी कॉलनी, मोहल्ला, झोपडपट्टी, इमारत, इमारतींचा समूह, गल्ली, वॉर्ड, पोलीस ठाण्याचे क्षेत्र, गाव किंवा गावांचा छोटा समूह असे कंटेनमेंट झोनचे क्षेत्र असू शकेल. यापेक्षा मोठे क्षेत्र (संपूर्ण तालुका किंवा संपूर्ण महापालिका क्षेत्र इत्यादी) कंटेनमेंट झोन म्हणून मुख्य सचिवांशी सल्लामसलत करुन जाहीर करता येऊ शकेल. कंटेनमेंट झोन क्षेत्रात फक्त अत्यावश्यक बाबींसंदर्भातील कार्याला परवानगी देण्यात येत आहे. वैद्यकीय कारण आणि अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा वगळता अन्य कोणत्याही कारणासाठी या क्षेत्रात लोकांना बाहेर जाण्या-येण्यास पूर्णत:  प्रतिबंध करण्यात येत आहे. यासंदर्भात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शिकेतील सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.

*रेड झोनमध्ये पुढील कामे सुरु राहतील-*
● या आधी  अत्यावश्यक सेवेची जी दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती, ती दुकाने पूर्ववत सुरु राहतील.
● या आदेशाच्या आधी दिलेले निर्देश आणि शिथिलतेचे निकष लक्षात घेऊन व महापालिकेच्या धोरणानुसार अत्यावश्यक सेवा नसणारी दुकाने पूर्ववत सुरु राहतील. परवानगी असल्यास मद्य विक्रीची दुकाने सुरु राहतील.
●       या आधी मॉल, उद्योग, दुकाने, प्रतिष्ठाने सुरु ठेवण्याची परवानगी नव्हती.ती आता देण्यात आली आहे. सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत या कालावधीत यंत्रसामग्री, फर्निचरची दुरुस्ती, देखभाल, निगा राखणे, पावसाळ्यापूर्वीची कामे या सर्व ठिकाणी करता येतील. मात्र याशिवाय कोणतीही (वाणिज्यिक) कामे  करता येणार नाहीत. उत्पादन सुरु करता येणार नाही.
● अत्यावश्यक  आणि अत्यावश्यक नसलेल्या वस्तू आणि साहित्यासाठी ई-कॉमर्स प्रणालीचा वापर करता येईल.
● या  आधी ज्या औद्योगिक घटकांना  सुरु करण्याची परवानगी दिली होती, ते औद्योगिक घटक सुरु राहतील.
● ज्या खाजगी व शासकीय बांधकामांना सुरु करण्याची परवानगी देण्यात आली होती, ती सुरू राहतील. पावसाळ्यापूर्वीची सर्व शासकीय व खाजगी बांधकामे करण्याची परवानगी देण्यात येत आहे.
●  टॅक्सी, कॅब  आणि समूहाची वाहतूक करणारी साधने, रिक्षा यांना परवानगी नाही. अत्यावश्यक कामासाठी एक आणि त्याशिवाय फक्त दोन अशा व्यक्तींच्या वाहतुकीसाठी चारचाकी वाहनास परवानगी असेल. फक्त एकट्यालाच अत्यावश्यक कामासाठी दुचाकी वापरता येईल.
● अत्यावश्यक सेवेच्या कामासाठी येणारे कर्मचारी (आरोग्य आणि वैद्यकीय, कोषागारे, आपत्ती व्यवस्थापन, पोलीस, अन्न व नागरी पुरवठा, महापालिका सेवा, एनआयसी, एफसीआय ), त्यांच्या आवश्यकतेनुसार कार्यरत राहतील. संचालनालये आणि आयुक्तालयांसह सर्व शासकीय कार्यालये (उपनिबंधक/ प्रादेशिक परिवहन कार्यालये, उप प्रादेशिक परिवहन कार्यालये सुरु राहतील. अशैक्षणिक कार्यासाठी उपयोगात येणारे विद्यापीठीय आणि महाविद्यालयांचे कर्मचारी, पेपर तपासणी, मूल्यमापन,निकाल आणि ई-कंटेट (आशय) ची निर्मिती करणारे कर्मचारी कार्यालयात येऊ शकतील. मात्र एकूण मनुष्यबळाच्या ५ टक्के किंवा किमान १० व्यक्ती (जी संख्या अधिक असेल ती.) या प्रमाणातच अशा कर्मचाऱ्यांची उपस्थिती कार्यालयात राहणे आवश्यक राहील.केंद्र सरकारची कार्यालये ठरवून दिलेल्या निकषानुसार सुरु राहतील.)
● होम डिलिव्हरी (घरपोच सेवा ) करणारी उपहारगृहे आणि स्वयंपाकगृहे सुरु राहतील.
● या आधी जी कामे सुरु करण्याची परवानगी देण्यात आली होती, ती सुरु राहतील. मात्र सर्व खाजगी कार्यालये बंद राहतील.

*आरोग्य सेतू वापर*

● आरोग्य सेतू हे कोरोना संसर्गाच्या संभाव्य जोखमीची लवकर ओळख करण्यास मदत करते. हा ॲप  व्यक्ती आणि समुदायासाठी ढाल म्हणून कार्य करतो. 
● कार्यालये आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षितता ठेवण्याच्या दृष्टीकोनातून  मोबाइल फोन असलेल्या सर्व कर्मचार्‍यांनी आरोग्य सेतू डाऊनलोड  केले आहे, याची कार्यालय प्रमुखांनी खात्री करावी.  
● नागरिकांनी त्यांच्या मोबाइल फोनवर आरोग्य सेतू डाऊनलोड करावे व त्यांच्या आरोग्य स्थितीची माहिती त्यावर अद्यावत ठेवावी असा सल्ला जिल्हा प्रशासन देऊ शकते. आजाराचा धोका असलेल्या व्यक्तिला या वेळेवर वैद्यकीय सेवा मिळण्यास मदत होईल. 

*विशिष्ट प्रकरणांमध्ये व्यक्ती आणि वस्तू/ मालाची वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी निर्देश-*
● सर्व यंत्रणांनी डॉक्टर्स, परिचारिका आणि  वैद्यकीय कर्मचारी,  स्वच्छता कर्मचारी आणि रुग्णवाहिकांना कोणत्याही प्रकारच्या निर्बंधाशिवाय राज्यातल्या राज्यात आणि एका राज्यातून दुसऱ्या राज्यात  जाण्यासाठी परवानगी द्यावी.
● सर्व प्रकारच्या जीवनावश्यक  वस्तूंची वाहतूक व , मालवाहतूक करणाऱ्या  आणि रिकाम्या ट्रक यांना राज्यातल्या राज्यात  येण्या - जाण्यास सर्व यंत्रणांनी परवानगी द्यावी.
● शेजारील देशांसोबत जे करार करण्यात आले आहेत त्या अंतर्गत होणाऱ्या कोणत्याही वस्तू किंवा माल-वाहतुकीस आपल्या सीमेवर प्रतिबंध करण्याचा अधिकार  कोणत्याही यंत्रणेला नसेल.

*रेड झोन व्यतिरिक्तचे क्षेत्र* 
● या आदेशाच्या अनुच्छेद ४ मध्ये समाविष्ट बाबी वगळता तसेच स्पष्टपणे प्रतिबंधित किंवा बंदी घातलेल्या बाबी वगळता अन्य सर्व बाबींना खालील अटींच्या अधीन राहून परवानगी असेल. 
● परवानगी असलेल्या बाबी करण्यासाठी कोणत्याही शासकीय प्राधिकाऱ्याकडून अनुमती, मंजुरी घेण्याची आवश्यकता नाही.
● क्रीडा संकुल, खेळाचे मैदान आणि अन्य सार्वजनिक खुल्या जागा या व्यक्तिगत व्यायामासाठी खुल्या राहतील; तथापि, प्रेक्षक आणि समूह व्यायामप्रकार किंवा खेळ आदींना अनुमती नसेल. सर्व शारीरिक व्यायाम इत्यादी हे योग्य शारीरिक अंतराचे (सोशल/ फिजिकल डिस्टंसिंग) नियम पाळून करता येतील.
● _*सर्व सार्वजनिक आणि वैयक्तिक वाहतुकीचे व्यवस्थापन खालीलप्रमाणे करावे:*_  
दुचाकी वाहने : १ चालक (रायडर)/ तीनचाकी वाहन : १ अधिक २/ चारचाकी वाहन : १ अधिक 
● जिल्ह्याअंतर्गत बस वाहतूक ही आसनक्षमतेच्या कमाल ५० टक्के क्षमतेनुसार चालविण्यास परवानगी राहील. तथापि, बसमध्ये योग्य शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन होण्यासह बसचे निर्जंतुकीकरण (सॅनिटायजेशन) करणे आवश्यक राहील. 
● आंतरजिल्हा बस सेवेच्या अनुषंगाने वेगळे आदेश निर्गमित करण्यात येतील.
● सर्व दुकाने (मार्केट/शॉप्स) सकाळी ९ वा. ते सायं. ५ वा. या कालावधीत चालू ठेवता येतील. कुठेही गर्दी किंवा योग्य शारीरिक अंतराच्या नियमांचा भंग होत असल्याचे निदर्शनास आल्यास अशी दुकाने तात्काळ बंद करण्याचे आदेश प्राधिकृत अधिकाऱ्यांकडून देण्यात येतील.
● कंटेनमेंट झोनमध्ये आरोग्य विषयक प्रोटोकॉल मागील आदेशाप्रमाणेच लागू राहील. या मार्गदर्शक सूचनांव्यतिरिक अन्य कुठलीही सूचना, आदेश  जिल्हा, विभागीय, राज्य प्राधिकरणाला मुख्य सचिवांच्या मान्यतेशिवाय काढता येणार नाहीत. कुठल्याही व्यक्तींकडून या आदेशातील सूचनांचे उलल्ंघन झाल्यास त्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या कलम ५१ ते ६० नुसार कारवाई केली जाईल. त्यासोबतच कलम भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ नुसार कायदेशीर कारवाईस पात्र राहील. तसेच अन्य कायदेशीर कारवाई देखील केली जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com