"कुकडी', "घोड' पाणलोटात पाऊस जोर धरीना

संजय आ. काटे
Thursday, 6 August 2020

हा पाऊस सध्या इतरत्र पडणाऱ्या मुसळधार पावसाच्या तुलनेत किरकोळ आहे. धरणांमध्ये नव्या पाण्याची आवक सुरू झालेली नसली, तरी उन्हाळ्यातच काही धरणांचे पाणी शिल्लक राहिले होते. 

श्रीगोंदे : (अहमदनर) कुकडी व घोड धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अजूनही पावसाने जोर धरलेला नाही. धरण क्षेत्रात किरकोळ पाऊस होत असल्याची माहिती आहे. त्यामुळे धरणांतील पाणीसाठ्यात अपेक्षित वाढ होताना दिसत नाही. दरम्यान, तालुक्‍यात दोन महिन्यांच्या अपेक्षित सरासरीच्या दुप्पट पाऊस झाल्याची सरकारी आकडेवारी आहे. 

कुकडी व घोड धरणांवर अवलंबून असणारा येथील शेतकरी सध्या संभ्रमात आहे. धरण क्षेत्रात पाऊस नसला, तरी तालुक्‍यात गेल्या दोन महिन्यांत चांगला पाऊस झाला. आज सकाळच्या आकडेवारीनुसार "कुकडी'च्या पाचही धरणांच्या मालिकेत प्रत्येक ठिकाणी 25 ते 35 मिलिमीटर पावसाची नोंद आहे.

हेही वाचा - रोहित पवार धावले मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मतदीला

अर्थात, हा पाऊस सध्या इतरत्र पडणाऱ्या मुसळधार पावसाच्या तुलनेत किरकोळ आहे. धरणांमध्ये नव्या पाण्याची आवक सुरू झालेली नसली, तरी उन्हाळ्यातच काही धरणांचे पाणी शिल्लक राहिले होते. 

डिंभे धरणात आजही पाच टीएमसी उपयुक्त पाणी आहे. कुकडी प्रकल्पात साडेसात टीएमसी उपयुक्त पाणी आहे. घोड धरणात सध्या दोन टीएमसी उपयुक्त पाणी आहे.

या परिसरात थोड्या-फार प्रमाणात पडणाऱ्या पावसाचे पाणी दोन दिवसांत धरणात येण्यास सुरवात झाल्यानंतर नेमकी स्थिती समजणार आहे. मात्र, राज्यात व आसपासच्या परिसरात चांगला पाऊस होत असला, तरी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाला जोर नसल्याने शेतकरी थोडासा विचारात आहे. 

दरम्यान, सरकारी यंत्रणेच्या माहितीनुसार, जूनमध्ये सरासरी 69, तर जुलैमध्ये 100 मिलिमीटर पाऊस पडेल, असा अंदाज होता. प्रत्यक्षात 410 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे सरासरीच्या दुप्पट-तिपटीहून अधिक पाऊस झाला आहे. अहमदनगर

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There is no rain in "Kukdi Dam", "Ghod Dam" watershed