राहुरीत एकही ग्रामपंचायत बिनविरोध नाही, उंबरे येथे दोन गटांत वाद

विलास कुलकर्णी
Tuesday, 5 January 2021

काही अपक्ष उमेदवारांनी नशिब आजमावण्यासाठी अर्ज कायम ठेवले. वांबोरीत ऍड. सुभाष पाटील विरुद्ध मंत्री तनपुरे यांच्या गटात लढत आहे.

राहुरी : तालुक्‍यातील 44 ग्रामपंचायतींच्या 418 जागांच्या निवडणुकीसाठी आज 1372 पैकी 501 जणांनी अर्ज मागे घेतले. 51 सदस्यांची बिनविरोध निवड झाली. उर्वरित 367 सदस्यांसाठी 851 उमेदवार रिंगणात आहेत. मात्र, तालुक्‍यात एकही ग्रामपंचायत बिनविरोध झाली नाही.

उंबरे ग्रामपंचायतीच्या टेबलसमोर मुदतीनंतर अर्ज माघारीच्या मुद्द्यावरून दोन गटांत शाब्दिक चकमक झाली. पोलिसांनी एकाला ताब्यात घेतल्यावर वाद शमला. 
तालुक्‍यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे व शिवसेनेचे उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्याविरुद्ध खासदार डॉ. सुजय विखे पाटील व माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या गटात बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये लढती होत आहेत.

हेही वाचा - गडाखांमुळे शनिशिंगणापूर ग्रामपंचायत बिनविरोध

काही अपक्ष उमेदवारांनी नशिब आजमावण्यासाठी अर्ज कायम ठेवले. 
वांबोरीत ऍड. सुभाष पाटील विरुद्ध मंत्री तनपुरे यांच्या गटात लढत आहे. उंबरे येथे तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष नामदेव ढोकणे, माजी संचालक सुनील आडसुरे यांच्याविरुद्ध कारभारी ढोकणे, आप्पासाहेब दुशिंग, गोरक्षनाथ दुशिंग यांच्या गटात लढत आहे.

उंबरे ग्रामपंचायतीच्या टेबलसमोर अर्ज माघारीच्या मुदतीनंतर एका गटाने उमेदवारी माघारीचे अर्ज दाखल केले. त्यास विरोधी गटाने आक्षेप घेतला. शाब्दिक चकमक, गोंधळ वाढल्यावर पोलिसांनी एकास ताब्यात घेतले. मुदतीनंतर माघारीचा प्रयत्न फसला. 

राहुरी खुर्द येथे तनपुरे कारखान्याचे संचालक नंदकुमार डोळस विरुद्ध राष्ट्रवादीच्या निर्मला मालपाणी यांच्या गटात लढत आहे. गुहा येथे तनपुरे समर्थक सुरेश वाबळे विरुद्ध विखे समर्थक साईनाथ कोळसे यांच्या गटात लढत आहे. गणेगाव येथे भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल भनगडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 

तालुक्‍यातील 44 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी 168 मतदानकेंद्रे आहेत. मतदानप्रक्रियेसाठी 925 अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. प्रत्येक मतदान केंद्रासमोर चोख पोलिस बंदोबस्त राहील. आज अर्ज माघारीनंतर चिन्हवाटप करण्यात आले. 
- फसियोद्दीन शेख, तहसीलदार, राहुरी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There is no unopposed Gram Panchayat election in Rahuri