विरोधानंतरही सीनापात्रात होणार जॉगिंग पार्क 

amc nagar
amc nagar

नगर : महापालिकेच्या स्थायी समितीची सभा आज ऑनलाइन झाली. या सभेत नगरसेवक गणेश भोसले, कुमार वाकळे व सुभाष लोंढे यांनी सीना नदीपात्रालगत वृक्षलागवड व जॉगिंग पार्क करण्यास जोरदार विरोध केला; मात्र बहुमताने या पार्कला मंजुरी मिळाली आहे. सीना नदीपात्रात देशी व मोठ्या वृक्षांची लागवड, तसेच मातीचाच जॉगिंग पार्क करण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे. 

सभेला सभापती मुदस्सर शेख, गणेश भोसले, कुमार वाकळे, सुभाष लोंढे, सुवर्णा जाधव, योगिराज गाडे, सोनाली चितळे, उपायुक्‍त डॉ. प्रदीप पठारे, नगरसचिव एस. बी. तडवी, शहर अभियंता सुरेश इथापे, अभियंता श्रीकांत निंबाळकर आदी उपस्थित होते. 

सीना नदीपात्रातील अतिक्रमणे व गाळ दोन वर्षांपूर्वी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी काढून पात्र रुंद केले होते. या पात्रालगत सुशोभीकरणासाठी अमृत योजनेत दोन कोटी रुपयांचा निधी आला होता. या कामाची निविदा स्थायी समितीत मंजुरीसाठी ठेवण्यात आली होती. आधीच्या पालकमंत्र्यांच्या जवळच्या व्यक्‍तीची निविदा मंजुरीसाठी ठेवण्यात आली होती. सभेत हा विषय मांडताच गणेश भोसले यांनी, वृक्षलागवड कोठे करायची आहे, असा प्रश्‍न विचारला. महापालिका अधिकाऱ्यांनी, "सीना नदीपात्रालगत' असे सांगताच भोसले, वाकळे व लोंढे यांनी विरोध केला. भोसले म्हणाले, ""पिंपळगाव माळवी, डोंगरगण, जेऊर भागात जोरदार पाऊस झाल्यास सीनेला पूर येतो. त्यात झाडे वाहून जातील. नदीपात्रालगत झाडे लावू नयेत. जॉगिंग पार्कमध्ये ब्लॉक बसविण्यात येतील. त्यामुळे नदीपात्रावर परिणाम होईल.'' 

सीनेचे पात्र कमी झाल्यास त्याचा परिणाम शहरावर होईल, असे भोसले, वाकळे व लोंढे यांचे म्हणणे होते. मात्र, सीना पात्रात वृक्षलागवडीला बहुमताने मंजुरी मिळू लागल्याने भोसले यांनी, "10 फूट उंच असणारी केवळ देशी झाडेच लावावीत. 100 मीटर परिसरात झाडे लावण्यापेक्षा 150 मीटरपर्यंत लावा; पण ब्लॉक अथवा सिमेंट कॉंक्रिटचे काम जॉगिंग पार्कसाठी करू नये,' अशी सूचना मांडली. सभापती शेख यांनी नदीपात्रालगत वृक्षारोपण व जॉगिंग पार्कला मंजुरी देताना मोठी व देशी झाडेच लावावीत, तसेच जॉगिंग पार्क मातीचाच असावा, अशी अट घालून निविदा मंजूर केली. 

स्पर्धा परीक्षा केंद्राचे खासगीकरण बासनात 
महापालिकेच्या स्पर्धा परीक्षा केंद्राचे खासगीकरण करण्याचा प्रस्ताव सभेत आज मांडण्यात आला. तत्पूर्वी काल (ता. 20) उपमहापौर मालन ढोणे यांनी सभापतींना पत्र लिहून, हा प्रस्ताव मंजूर करू नये, अशी विनंती केली होती. प्रस्तावाचे सभेत वाचन होताच सर्व सभासदांनी जोरदार विरोध केला. महापालिकेचे स्पर्धा परीक्षा केंद्र गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आहे. केंद्रासाठी पैसे लागत असतील तर शासनाकडे पाठपुरावा करून निधी मागवा, असे नगरसेवकांनी सांगितले. सभापती शेख यांनी हा प्रस्ताव नामंजूर केला.

अहमदनगर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com