ठेकेदाराचे बिल थांबल्याचे "त्यां'ना दु:ख : कळमकर 

अमित आवारी
Saturday, 18 July 2020

विरोधकांना पोटशूळ उठला असून, त्यांनी पूर्णपणे चुकीचे आरोप करून थयथयाट चालविला आहे, अशी टीका माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी केली. 

नगर : तपोवन, बोल्हेगाव रस्त्यांच्या कामाबाबत सर्वप्रथम शिवसेनेने सरकारकडे तक्रार केली. त्यावर तत्काळ चौकशी समिती नेमून ठेकेदाराचे बिल थांबविले. त्यामुळे विरोधकांना पोटशूळ उठला असून, त्यांनी पूर्णपणे चुकीचे आरोप करून थयथयाट चालविला आहे, अशी टीका माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी केली. 

अवश्‍य वाचा - महापालिकेची स्थायी समिती सभा होणार ऑनलाईन 

तपोवन व बोल्हेगाव रस्त्यांच्या निकृष्ट कामाची चौकशी व तपासणी सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसने शिवसेनेवर टीका केली होती. त्या टीकेला उत्तर देताना कळमकर म्हणाले, की विरोधकांना सर्वांत जास्त दु:ख ठेकेदाराचे बिल थांबविल्याचे झाले आहे. नागरिकांनी त्यांचा कावेबाजपणा व खाबूगिरी वृत्ती ओळखली आहे. आता सारवासारव करण्यासाठी शिवसेनेकडे बोट दाखविले जात आहे. तपोवन व बोल्हेगाव रस्त्यांचे काम पुन्हा सुरू होऊन दर्जेदार होईपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नाही. पथदिवे घोटाळ्यात "लोटके'चा लोटा कोणाच्या हातात राहिला, हे नगरकरांनी पाहिले आहे. नगरकरांचे या रस्त्याबाबत समाधान होईपर्यंत ठेकेदाराला बिल अदा करू नये, अशीच शिवसेनेची भूमिका राहील.

बारस्करांकडून कळमकरांची "पोल'खोल 
तत्कालीन महापौर अभिषेक कळमकर यांच्या काळातील, प्रेमदान चौक ते प्रोफेसर कॉलनी चौक, टीव्ही सेंटर ते झोपडी कॅंटीनपर्यंत अद्ययावत पथदिवे उभारणीच्या 50 पोलच्या कामाची 50 लाख रुपयांची निविदा काढून मोठा भ्रष्टाचार केला, असा आरोप महापालिकेचे विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी केला.  बारस्कर यांनी या भ्रष्टाचाराची पोलखोल आज प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन केली. बारस्कर म्हणाले, की प्रत्यक्षात प्रोफेसर कॉलनी चौक ते प्रेमदान चौकापर्यंत 48 पोल उपलब्ध आहेत. यामध्येही दोन पोल गहाळ आहेत. काही पोलवर दिवेही नाहीत. पथदिवे बसविल्यापासून त्यांना वीज मिळालेली नाही. एका पोलची किंमत 93 हजार रुपये आहे. झोपडी कॅंटीन, मकासरे हेल्थ क्‍लब, टीव्ही सेंटर या ठिकाणी तर पोलच बसविण्यात आले नाहीत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: They are saddened that the contractor's bill has stopped