त्यांना मिळते नाले बंद केल्याची शिक्षा 

They get the punishment of closing the nallas
They get the punishment of closing the nallas

नगर : सावेडी उपनगरातील दसरेनगर, नित्यसेवा सोसायटी व वसंत टेकडी परिसरातून निघणारा नाला कुष्ठधाम, रासनेनगर, पाइपलाइन रस्तामार्गे सीना नदीला मिळतो. बऱ्याच ठिकाणी या नाल्याला पाइप टाकून भुयारी गटाराचे स्वरूप प्राप्त करून दिले गेले आहे. या पाइपवर शेकडो बंगले, इमारती व प्लॉट आहेत. पावसाचे पाणी नैसर्गिक उताराने वाहण्याचा प्रयत्न करते; मात्र या भागात नाले खुले नसल्याने व नाल्यांवरच घरे असल्याने प्रत्येक पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होते. नरहरीनगर भागाला या पुराचा सामना करावा लागतो. महापालिकेने नाल्यावर बांधकामाचे दिलेले परवाने नागरिकांसाठी समस्या ठरत आहेत. 

नामदेवनगर परिसरात या नाल्यावरच प्लॉटला मंजुरी मिळाली आहे. नय्यर विद्यालयापासून हा नाला बंद पाइपमधून वाहू लागतो. त्यामुळे या परिसरात पावसाचे पाणी जाण्यासाठी वेगळी अशी व्यवस्थाच नाही. हा भुयारी नाला बायजाबाई हाऊसिंग सोसायटी, समर्थनगरमधील बंगल्यांच्या खालून निमूटपणे वाहत पाइपलाइन रस्त्यावर सागर हॉटेलजवळ येतो. त्याला कॅनॉलचे रूप देत खुले करून 25-30 मीटर वाहू देताच पुन्हा पाइप टाकून बंद गटाराचे स्वरूप दिले आहे. या बंद गटारावर महापालिकेने प्लॉट व बांधकामांना मंजुरी दिली आहे. 20 ते 25 वर्षांपूर्वी नैसर्गिकपणे वाहणारा हा नाला आता डोळ्यांनी दिसतही नसल्याचे परिसरातील वृद्ध नागरिक सांगतात. 

शीलाविहारकडून येणारे एक भुयारी गटार जिकिरिया मळा, दळवी मळ्यापर्यंत आलेल्या भुयारी नाल्याला मिळते, असे स्थानिक लोक सांगतात. कोहिनूर मंगल कार्यालयाजवळ नाला नरहरीनगर व रेणुकानगरमध्ये बंद गटाराच्या स्वरूपात दिसू लागतो. आनंद शाळेसमोरून रेणुकानगरमध्ये येणाऱ्या रस्त्याजवळ हा नाला पुन्हा दिसू लागतो; मात्र त्याला पाइप टाकून पुन्हा भुयारी गटाराचे स्वरूप देण्यात येते. चैत्रबन कॉलनीत पुन्हा नाला खुला होतो; मात्र मोठे पाइप टाकून तो बंदिस्त करण्याची तयारी सध्या सुरू आहे. त्यासाठी सिमेंटचे मोठे पाइप आणून टाकण्यात आले आहेत. चैत्रबन, मंगल व वरदविनायक हाऊसिंग सोसायटी परिसरात नाल्याच्या पात्रालगत संरक्षक भिंती बांधून अतिक्रमणे करण्यात आली आहेत. या नाल्याला जागोजागी भुयारी गटाराचे स्वरूप देऊन त्यावर बांधकाम व्यावसायिकांनी घरे बांधून विकली आहेत. या बांधकामांना महापालिकेच्या नगररचना विभागाने बांधकाम परवाने दिले आहेत. निसर्गालाच आव्हान देत ही घरे उभारल्याने, पावसाळ्यात पावसाचे पाणी नागरिकांच्या घरांमध्ये जाते. भुयारी गटारांची सफाई करता येत नसल्याने समस्या अधिक उग्र रूप धारण करत आहे. नाल्यांचे नैसर्गिक प्रवाह खुले झाले नाहीत, तर ही समस्या दिवसेंदिवस बिकट होत जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com