
नगर-पुणे महामार्गावर पुणे व औरंगाबाद एमआयडीसीपासून साधारणपणे शंभर किलोमीटरवर सुपे एमआयडीसी येते. तसेच शिक्रापूर, चाकण, रांजणगाव या एमआयडीसीपासून जवळ असल्याने, सुपे औद्योगिकदृष्ट्या मध्यवर्ती ठिकाण होणार आहे.
पारनेर ः तालुक्यातील सुपे येथे "फेज-थ्री' एमआयडीसीची अधिसूचना नुकतीच जारी झाली. त्यासाठी हंगे येथील 755 हेक्टर, तर सुपे हद्दीत 80 हेक्टर क्षेत्र संपादन करण्यासाठी मोजणीप्रक्रिया सुरू होणार आहे. भविष्यात सुपे परिसर राज्यातील एक मोठे औद्योगिक क्षेत्र म्हणून पुढे येण्याची शक्यता आहे.
सुपे येथे जुनी एमआयडीसी आहे. तिच्या जवळच म्हसणे फाटा येथे "सुपे फेज-टू' हे नव्याने एक जापनीज हब उभे राहत असून, तेथे परदेशी अनेक कंपन्या येत आहेत. त्यानंतर आता सुपे व हंगे येथे नव्याने "फेज थ्री'साठी भूसंपादन करण्याबाबत अधिसूचना जारी झाली आहे. परिणामी, सुपे परिसर राज्यात मोठा औद्योगिक परिसर म्हणून समोर येणार आहे.
हेही वाचा - केळी लावण्यासाठी पठ्ठ्याने विकली शेती
नगर-पुणे महामार्गावर पुणे व औरंगाबाद एमआयडीसीपासून साधारणपणे शंभर किलोमीटरवर सुपे एमआयडीसी येते. तसेच शिक्रापूर, चाकण, रांजणगाव या एमआयडीसीपासून जवळ असल्याने, सुपे औद्योगिकदृष्ट्या मध्यवर्ती ठिकाण होणार आहे. सुपे येथे एमआयडीसीचा तिसरा फेज होत असून, हंगे येथील 755, तर सुप्यातील 80 हेक्टर, अशी एकूण 835 हेक्टर भूसंपादन प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. तेथे लवकरच मोठे आयटी क्षेत्र उभे राहणार आहे.
सुप्यात सुरवातीला 1992मध्ये एमआयडीसीचा पहिला फेज 307.11 हेक्टरवर सुरू झाला. तेथे 314 भूखंड झाले. मात्र, त्यास फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मोठे उद्योग आले नाहीत. अनेकांनी फक्त औद्योगिक प्लॉट घेतले; मात्र उद्योग उभारले नाहीत. गेल्या अनेक वर्षांपासून ते मोकळेच आहेत. नंतर म्हसणे फाटा येथे फेज-टू जापनीज हब या नावाने 946.70 हेक्टर क्षेत्र संपादित होण्यास सुरवात झाली. पैकी 80 टक्के जमिनीचे अधिग्रहण झाले आहे.
मोठे अनेक उद्योग येथे येण्यास इच्छुक आहेत. काही उद्योग सुरूही झाले आहेत. आता नव्याने हंगे व सुपे येथील एकूण 835 हेक्टरवर नव्याने फेज-थ्रीसाठी भूसंपादनाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
रोजगाराच्या संधी मिळणार
सुपे येथे तिन्ही एमआयडीसी सुरू झाल्या, तर तालुक्यातीलच नव्हे, तर जिल्ह्यासह राज्यभरातील अनेकांना रोजगाराच्या अनेक संधी मिळणार आहेत. त्यातून या परिसरातील उद्योग-व्यवसायांना चालना मिळणार आहे. सुपे एमआयडीसीमुळे राज्यालाच एक नवी ओळख प्राप्त होणार आहे.