esakal | थोरात साखर कारखान्याने केले १२ लाख टनांचे गाळप

बोलून बातमी शोधा

shugar
थोरात साखर कारखान्याने केले १२ लाख टनाचे गाळप
sakal_logo
By
अशोक निंबाळकर

संगमनेर ः सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने 15 एप्रिलअखेर 12 लाख 29 हजार 610 टन उसाचे गाळप केल्याची माहिती अध्यक्ष बाबा ओहोळ यांनी दिली.

ओहोळ म्हणाले, ""चालू हंगाम साखर कारखान्यांसाठी अडचणीचा होता. विक्रमी ऊसउत्पादन, कोरोनाचे संकट, "लॉकडाउन'चा प्रश्‍न, साखरेचे कमी झालेले भाव, या सर्व पार्श्‍वभूमीवर थोरात कारखान्याने सहा हजार टन दैनिक गाळपक्षमता असलेल्या नव्या कारखान्यात 172 दिवसांमध्ये विक्रमी 12 लाख 29 हजार 610 टन उसाचे गाळप करून 12 लाख 36 हजार 290 क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.

या पूर्वी 11 लाख 53 हजार टन उसाचे गाळप कारखान्याने केले होते. तो उच्चांक कारखान्याने या वर्षी मोडीत काढला. कारखाना अजूनही सुरू आहे. त्यामुळे राज्यातील ऊसगाळपात प्रथम वीस कारखान्यांमध्ये थोरात कारखाना अग्रस्थानी आहे.

(स्व.) भाऊसाहेब थोरात यांनी घालून दिलेल्या, आर्थिक शिस्त, पारदर्शकता, काटकसर या त्रिसूत्रीचा वापर करीत कारखान्याने सहकारात कायम दीपस्तंभाप्रमाणे काम केले आहे. चालू हंगामातच कारखान्याने 40 हजार लिटर क्षमतेचा नवा डिस्टिलरी प्रकल्पही कार्यान्वित केला असून, यामुळे उपपदार्थनिर्मिती वाढली आहे.

कोरोना संकटात तालुक्‍यातील व परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी कारखान्याने नुकतेच 500 बेडचे कोविड केअर सेंटर कार्यान्वित केले आहे, असेही ओहोळ यांनी सांगितले.