संगमनेर तालुक्यातील तीन ग्रामपंचायती बिनविरोध

आनंद गायकवाड
Tuesday, 5 January 2021

संगमनेर तालुक्‍यात सर्वाधिक 94 ग्रामपंचायतींच्या 328 प्रभागांमधून 888 सदस्यांची निवड होणार आहे. 23 डिसेंबरपासून अर्ज भरण्यास सुरवात झाली होती.

संगमनेर ः तालुक्‍यातील 94 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरवात झाली असून, 888 जागांसाठी निवडणूक होत आहे. अर्जमाघारीनंतर आज रात्री उशिरापर्यंत प्रशासनाचे काम पूर्ण झाले नसल्याने, माघारीनंतरची स्थिती समजू शकली नाही. मात्र, तालुक्‍यातील तीन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे यांनी दिली. 

संगमनेर तालुक्‍यात सर्वाधिक 94 ग्रामपंचायतींच्या 328 प्रभागांमधून 888 सदस्यांची निवड होणार आहे. 23 डिसेंबरपासून अर्ज भरण्यास सुरवात झाली होती. तालुक्‍यातील शिर्डी विधानसभा मतदारसंघाला जोडलेल्या आश्वी गटातील 11 ग्रामपंचायती वगळता, निवडणुका जाहीर झालेल्या 94पैकी 83 ग्रामपंचायतींवर बाळासाहेब थोरात गटाचे निर्विवाद वर्चस्व आहे. त्यामुळे या वर्षीच्या निवडणुकीत आश्वी गटातील ग्रामपंचायतींवर सत्ता मिळविण्यासाठी थोरात गट सक्रिय झाला आहे. 

राज्यात महाविकास आघाडी सरकार असल्याने कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या तीन पक्षांची ताकद यात जोखली जाणार आहे. शिर्डी विधानसभा मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून विखे हाच पक्ष मानून काम करणाऱ्या व त्यांना मानणाऱ्या राजकीय कार्यकर्त्यांची मोठी फळी, तालुक्‍याची निर्विवाद सत्ता मिळविण्यासाठी कार्यरत झाली असल्याने, विखे यांचे वर्चस्व असलेल्या ठिकाणी थोरात यांच्या कार्यकर्त्यांनी जोर लावला आहे. 

रात्री उशिरा हाती आलेल्या माहितीनुसार, तालुक्‍यातील मिरपूर ग्रामपंचायतीच्या महिला उमेदवार प्रियंका रणमाळे यांच्या अर्जातील वय व मतदारयादीतील वयातील एक वर्षाच्या तफावतीमुळे, प्रतिस्पर्धी उमेदवाराने छाननीच्या वेळी हरकत घेतली होती. त्यामुळे त्यांचा अर्ज बाद झाल्याने त्यांनी याबाबत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. आज त्याची सुनावणी असल्याने निवासी नायब तहसीलदार सुभाष कदम व प्रशिक्षणार्थी अपर तहसीलदार स्वाती दाभाडे यांना औरंगाबाद न्यायालयात उपस्थित राहावे लागले होते. 

उमेदवारावर अन्याय करता येणार नाही, असे सांगत न्यायालयाने विरोधकांचा अर्ज फेटाळला. तसेच, बोटा गटातील आंबी खालसा व भोजदरी ग्रामपंचायती बिनविरोध करण्यात कॉंग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे यांना यश आले आहे. ज्येष्ठ नेते माधवराव कानवडे, जिल्हा परिषद सदस्य मिलिंद कानवडे व नानासाहेब कानवडे हे कॉंग्रेसअंतर्गतचे तीन गट एकत्र आल्याने निमगाव बुद्रुक ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three Gram Panchayats in Sangamner taluka unopposed