नगर महापालिकेत ‘या’ समितीत राष्ट्रवादीचेच वर्चस्व; भाजप व शिवसेनेला समान तर काँग्रेसला मात्र एकच जागा

अमीत आवारी
Thursday, 30 July 2020

महापालिकेच्या स्थायी समितीत आज आठ नवीन सदस्यांची निवड करण्यात आली. ही निवड महापालिकेच्या ऑनलाईन झालेल्या महासभेतून करण्यात आलेली आहे.

नगर : महापालिकेच्या स्थायी समितीत आज आठ नवीन सदस्यांची निवड करण्यात आली. ही निवड महापालिकेच्या ऑनलाईन झालेल्या महासभेतून करण्यात आलेली आहे. केवळ 13 मिनिटांतच ही सभा उरकली. भाजपकडून आता स्थायी समितीच्या सभापतीपदी मनोज कोतकर यांना बसविण्याची हालचाली सुरू झालेल्या आहेत.

महापालिकेची महासभा ऑनलाइन झाली. महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालन ढोणे, सभागृह नेते स्वप्नील शिंदे, विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, महापालिका आयुक्‍त श्रीकांत मायकलवार, उपायुक्‍त डॉ. प्रदीप पठारे, नगररचनाकार राम चारठाणकर आदींसह नगरसेवक, अधिकारी उपस्थित होते.

महापालिकेच्या स्थायी समितीत 16 सदस्य असतात. जानेवारीच्या शेवटी महापालिकेच्या स्थायी समितीमधील आठ सदस्यांची चिठ्ठी टाकून निवृत्ती करण्यात आली. त्यानंतर प्रशासकीय अडचणी व कोरोना विषाणूंचा प्रादुर्भावामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे स्थायी समितीतील आठ नवीन सदस्यांची निवड थांबलेली होती. मात्र राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने काढलेल्या आदेशानंतर महापौर वाकळे यांनी स्थायी समितीतील आठ सदस्यांच्या निवडीसाठी ऑनलाइन महासभा आज लावली होती.

या सभेत शिवसेनेचे दोन, भाजपचे दोन, राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक सदस्यांची निवड करण्यात यात आली. या निवडीसाठी शिवसेनेच्या गटनेत्या रोहिणी शेंडगे यांनी श्याम नळकांडे व विजय पठारे यांचे, भाजपच्या गटनेत्या उपमहापौर मालन ढोणे यांनी सोनाबाई शिंदे व मनोज कोतकर यांचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते संपत बारस्कर यांनी डॉक्टर सागर बोरुडे प्रकाश भागानगरे व परविन कुरेशी यांचे तर काँग्रेसच्या गटनेत्या सुप्रिया जाधव यांनी स्वतःचेच नाव सुचवले. त्यानुसार या सर्वांची स्थायी समितीच्या सदस्यपदी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी निवड जाहीर केली. निवडल्या गेलेल्या समस्यांचा कार्यकाल दीड वर्षांचा असणार आहे. 

निवडल्या गेलेल्या सदस्यांत भाजपकडून मनोज कोतकर यांचे नाव आहे मनोज कोतकर यांना स्थायी समितीच्या सभापतीपदी बसविण्यासाठी भाजप कडून हालचाली आता सुरू होण्याची चिन्हे आहेत.

स्थायी समिती नवीन सदस्य
शिवसेना :
शाम नळकांडे व विजय पठारे. 

भाजप : मनोज कोतकर व सोनाबाई शिंदे.

राष्ट्रवादी : सागर बोरुडे, परवीन कुरेशी व प्रकाश भागानगरे.

कॉंग्रेस : सुप्रिया जाधव

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three members of NCP and two members of BJP Shivsena in the Municipal Corporation