धक्कादायक! श्रीरामपूर तालुक्यात कोरोनामुळे तिघांचा मृत्यू; १५२ नागरीकांना कोरोनाची बाधा

गौरव साळुंके
Thursday, 23 July 2020

शहरासह तालुक्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे.

श्रीरामपूर (अहमदनगर) : शहरासह तालुक्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. शहरात आज कोरोनामुळे दोघांसह एका संशयीताचा मृत्यू झाला. तर तिघांना नव्याने कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. त्यामुळे आता तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या १५२ वर पोहचली आहे. आतापर्यंत पाच कोरोनाबाधितांसह दोन संशयितांचा मृत्यु झाला आहे. 

काही दिवसांपासुन शहरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढल्याने संसर्गाची साखळी तोडण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. शहरातील रेव्हेन्यु कॉलनी परिसरातील एका ५८ वर्षाच्या रुग्णाचा कोरोनामुळे आज मृत्यु झाला. चार दिवसांपूर्वी त्याला कोरोनाची बाधा झाल्याचे तपासणीत निष्पण झाले होते. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्याला नगर येथील जिल्हा रुग्णालयात हलविले होते. उपचार सुरु असताना पहाटे त्यांचा मृत्यु झाला.

अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
मुळा प्रवरा वीज संस्थेच्या परिसरातील एका ६० वर्षाच्या महिलेचा दुपारी कोरोनामुळे मृत्यु झाला. संबधीत महिलेला श्वास घेण्याचा त्रास होत असल्याने येथील डॉ. आंबेडकर वसतीगृहातील विलगीकरण कक्षात तपासणीसाठी आली होती. तेथे स्त्राव घेतल्यानंतर शहरातील संतलुक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतू उपचारापुर्वीच सदर महिलेचा मृत्यु झाला. मृत्यूनंतर तिचा तपासणी अहवाल करोना पॉझिटीव्ह आला.

तालुक्यातील गळनिंब परिसरातील एका कोरोना संशयीताचा सांयकाळच्या सुमारास मृत्यू झाला. आज दिवसभरात आढळून आलेल्या रुग्णांमध्ये शहरासह उंबरगाव येथील तीन रुग्णांचा समावेश झाल्याने शहरासह तालुक्यात १५२ नागरीकांना कोरोनाची बाधा झाली आहे. उपचारानंतर बरे झालेल्या २० रुग्णांना आज घरी सोडण्यात आले. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्याची संख्या ५८ झाली असुन ६५ कोरोनाबाधितांवर येथील संतलुक रुग्णालयात उपचार सुरु आहे.

कोरोनाचे आकडे जुळेना
स्थानिक प्रशासनातील समन्वयाचा अभावामुळे कोरोनाबाधित रुग्णांच्या आक़डेवारीचा हिशोब जुळत नाही. आरोग्य विभातील जबाबदार अधिकारी आपआपल्या सोईनुसार कोरोनाबाधित रुग्णांची माहिती देतात. त्याची एकत्रित बेरीज केली असता. रुग्ण संख्येत तफावत दिसुन येत आहे.
संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three people died due to corona virus in Shrirampur taluka