पोलिसाच्या कामात अडथळा आणणाऱ्यास तीन वर्षांची शिक्षा | Ahmednagar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 तीन वर्षांची शिक्षा

अहमदनगर : पोलिसाच्या कामात अडथळा आणणाऱ्यास तीन वर्षांची शिक्षा

अहमदनगर : न्यायालयाचे वॉरंट बजावण्यास गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्याच्या शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल देवराम मारुती गावडे (रा. गावडेवाडी, ढवळपुरी, ता. पारनेर) यास तीन वर्षे सक्‍तमजुरी आणि सहा हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायाधीश पी. एन. राव यांनी ठोठावली.

पोलिस कर्मचारी शरद देविदास गावडे, रत्नपारखी आणि शिंदे हे न्यायालयाचे अजामीनपात्र वॉरंट बजावण्यासाठी २७ नोव्हेंबर २०१६ रोजी ढवळपुरी (ता. पारनेर) येथे गेले होते. वॉरंटमधील आरोपी मारुती सखाराम गावडे यांचा मुलगा पोलिस कर्मचारी शरद गावडे यांना म्हणाला, की वॉरंटमधील आरोपी हे वडील असून, ते सध्या पुणे येथे दवाखान्यात उपचार घेत आहेत. त्यावेळी घरात पाहणी केली असता, शेजारील घरातून एक व्यक्‍ती बाहेर आली. ती मोठमोठ्याने आरडाओरड करू लागली. पोलिसांच्या दिशेने येऊन शासकीय कामात अडथळा आणला.

हेही वाचा: नांदेड : जबरी चोऱ्यांमध्ये होत आहे वाढ

वॉरंट हिसकावून फाडले. किसन केशव भुसारी यानेदेखील पोलिस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व दमदाटी केली. पारनेर पोलिस ठाण्यात आरोपी देवराम गावडे व किसन भुसारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

या खटल्यामध्ये सरकारी पक्षाच्या वतीने पाच साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयासमोर आलेला पुरावा, साक्षीदारांच्या साक्षी व सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी देवराम गावडे याला सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल तीन वर्षे सक्‍तमजुरी आणि सहा हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास तीन महिने सक्‍तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. सरकार पक्षाच्या वतीने ॲड. मोहन कुलकर्णी यांनी काम पाहिले. सहायक पोलिस उपनिरीक्षक ए. के. भोसले यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.

loading image
go to top