विशेष परवानगी काढून पर्यटक रंधा धबधब्याकडे

शांताराम काळे
Saturday, 8 August 2020

दोन दिवसापासून पाऊस सुरु झाल्याने राजूरपासून १० किलोमीटरवर असलेल्या कातळापूर ओढ्यावरील रंधा धबधब्याचे फेसळनारे रूप पाहण्यासाठी स्थानिकाची पाऊले हळू हळू तिकडे वळू लागली आहेत.

अकोले (अहमदनगर) : दोन दिवसापासून पाऊस सुरु झाल्याने राजूरपासून १० किलोमीटरवर असलेल्या कातळापूर ओढ्यावरील रंधा धबधब्याचे फेसळनारे रूप पाहण्यासाठी स्थानिकाची पाऊले हळू हळू तिकडे वळू लागली आहेत. तर काही निसर्गप्रेमी विशेष परवानगी घेऊन या धबधब्याची छबी आपल्या कँमेरात टिपण्यासाठी येत आहेत. 

पर्यटकांना बंदी असली तरी जलसंपदा विभाग व पोलिस कर्मचारी यांचा कुठे मागमूसही नसल्याने काही पर्यटक बिनधास्त रंधा फॉलजवळ दिसून आले. मात्र आम्ही देवीचे दर्शन घ्यायला आलो, असे म्हणत रंधा धबधब्याचा तो अवर्णनीय अविष्कार पाहत आनंद घेत धबधब्याच्या छ्बिबारोबारच आपली छबी काढण्यासही विसरले नाही. सध्या मोठा धबधबा अजून सुरु झाला नसला तरी त्याच्या शेजारी दक्षिण दिशेला असलेल्या कातला पूर ओढ्यावरील धबधबा अवतीर्ण झाला आहे. चार ठिकाणी काळ्या कातळावरून थांबत उद्या मारत तो ५० फुट खोल दरीत झेपावताना मनात धस्स होते.

पर्यटक त्याचे मनमोहक दृश्य पाहण्यासाठी जवळ जवळ सरकतात. तर फोटोग्राफर झूम करत तो धबधबा आपल्या कवेत घेण्याचा प्रयत्न करतात. भंडारदरा व राजूर गावापासून १० किलोमीटरवर रंधा या गावात एक विशाल धबधबा असून तो गावाच्या नावावरूनच रंधा फॉल म्हणून प्रसिद्ध आहे. सध्या हा धबधबा त्यावर असलेल्या जलविद्युत प्रकल्पामुळे फक्त पावसाळ्यातच पहायला मिळतो. पावसाळ्यात हा धबधबा अतिशय रौद्र रूप धारण करतो. पावसाळ्यात मुख्य धबधब्याच्या उजव्या बाजुने अजुन एक धबधबा पहायला मिळतो. दोन्ही धबधबे पुर्ण क्षमतेने वाहत असताना पाहणे हा एक रोमांचित करणारा अनुभव आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tourist Randha falls in Akole taluka with special permission