esakal | दुर्लक्षित राहीलेली नवीन पर्यटनस्थळे प्रकाशात
sakal

बोलून बातमी शोधा

Tourists from Sangamner taluka discovered new tourist destinations

सह्याद्रीच्या कुशीतील भटकंती नसानसात भिनलेल्या फिरत्या भटक्यांनी कोरोना प्रादुर्भावाच्या काळात तालुक्यातील आजवर दुर्लक्षित राहीलेली नवीन पर्यटनस्थळे प्रकाशात आणली आहेत.

दुर्लक्षित राहीलेली नवीन पर्यटनस्थळे प्रकाशात

sakal_logo
By
आनंद गायकवाड

संगमनेर (अहमदनगर) : सह्याद्रीच्या कुशीतील भटकंती नसानसात भिनलेल्या फिरत्या भटक्यांनी कोरोना प्रादुर्भावाच्या काळात तालुक्यातील आजवर दुर्लक्षित राहीलेली नवीन पर्यटनस्थळे प्रकाशात आणली आहेत.

पाच महिन्यांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाला आहे. टप्प्याटप्प्याने कोरोनाचे संकट अधीकाधिक गहिरे होत गेले. या काळात विविध उपाययोजना प्रादुर्भाव रोखण्यासाठी, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राबविण्यात आले. लॉकडाऊन केल्याने बंद पडलेल्या असंख्य उद्योगधंद्यात पर्यटनाशी निगडीत व्यवसायही होते. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती तसेच खासगी प्रवासावरही मोठी बंधने आल्याने पर्यटनावरही परिणाम झाला होता.

प्रशासनाने केलेल्या कडक नियमांमुळे प्रवास करणे जिकीरीचे झाले होते. तसेच अकोले या पर्यटकांसाठी आवडीचे ठिकाण असलेल्या नेहमीच्या अनेक स्थळांवर स्थानिकांनी कोरोनाच्या भितीमुळे बाहेरील प्रवाशांना निर्बंध घातले होते. अशा परिस्थितीत सह्याद्रीच्या कडेकपाऱ्या पायाखाली घालणाऱ्या भटक्यांनी स्थानिक पातळीवरील बरीच दुर्लक्षीत स्थळे शोधली आहेत. 

संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील पिंपळगाव माथा परिसरातील बाळेश्वराच्या डोंगररांगेत उगम पावलेला येळुशीदरा धबधबा या वर्षी पडलेल्या दमदार पावसामुळे वाहता झाला आहे. संगमनेर पासून अवघे 25 किलोमिटरवरील गाडी रस्ता असलेल्या पिंपळगाव माथा गावातून याचे दर्शन घडते. नालाकृती डोंगररांगेतून खाली झेपावणाऱ्या या धबधब्याचे सौंदर्य पाहण्यासाठी थोडे उजवीकडे असलेल्या नैसर्गिक बुरुजाकडे जावे लागते. या धबधब्याची भव्यता अनुभवण्यासाठी याच्या पायथ्याशी जावे लागते.

पेमगिरी गावातील शहागडाच्या डाव्या बाजूच्या कच्च्या रस्त्याने दोन किलोमिटर अंतर गेल्यानंतर पुढील 25 मिनीटांच्या पायपिटीनंतर या धबधब्याच्या पायथ्याशी पोचता येते. शेवटच्या टप्प्यात घनदाट जंगलातून प्रवास करावा लागतो. सुमारे 70 ते 80 फुटांवरुन कोसळणारा शुभ्र प्रपात पायथ्याशी असलेले दोन पाझर तलाव भरतो. या मार्गावरील प्रवासात पेमगिरी किल्ला, मोठा वटवृक्ष, मोरदरा अशी एका दिवसांची सुंदर सहल करता येते. मात्र हा धबधबा केवळ काही दिवसच बघता येणार आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर