सेल्फी वुईथ बिबट्या; राहुरी तालुक्यात ट्रॅक्टरचालकाचे जीवघेणे धाडस

विलास कुलकर्णी
Saturday, 21 November 2020

दवणगाव येथे शेतात मशागत करताना ट्रॅक्‍टरचालक शेतकऱ्यास भरदिवसा बिबट्याचे दर्शन घडले. या बहाद्दर शेतकऱ्याने त्याच्या सहवासातच नांगरणी केली.

राहुरी (अहमदनगर) : दवणगाव येथे शेतात मशागत करताना ट्रॅक्‍टरचालक शेतकऱ्यास भरदिवसा बिबट्याचे दर्शन घडले. या बहाद्दर शेतकऱ्याने त्याच्या सहवासातच नांगरणी केली. तब्बल दीड एकर नांगरणी होईपर्यंत बिबट्या ट्रॅक्‍टरभोवती भक्ष्याच्या शोधार्थ फिरत राहिला. ट्रॅक्‍टरवरून शेतकऱ्याने मोबाईलवर "सेल्फी' घेतला. व्हिडिओ काढला. हे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. 

वैभव कासार (रा. दवणगाव, ता. राहुरी) असे या धाडसी शेतकऱ्याचे नाव. ट्रॅक्‍टरद्वारे शेतात आज दुपारी नांगरणी सुरू असताना तेथे बिबट्या आला. मात्र, वैभव कासार यांनी नांगरणी सुरूच ठेवली. बिबट्या ट्रॅक्‍टरभोवती अनेक वेळा फिरला. शेजारच्या उसात जाऊन पुन्हा मोकळ्या शेतात तो येत होता. बिबट्याच्या डरकाळ्यांनी परिसर दुमदुमला. मात्र, न घाबरता वैभव यांनी मोबाईलमध्ये हा सर्व प्रकार कैद केला. 

प्रवरा नदीकाठच्या आंबी, अंमळनेर, दवणगाव, केसापूर या गावांत बिबट्याची कायम दहशत आहे. बिबट्याचे वारंवार दर्शन घडत असल्याने काही शेतकऱ्यांनी भीतीपोटी कापसाची वेचणी थांबविली. बिबट्याला पकडण्यासाठी वन खात्याने पिंजरा लावावा, अशी मागणी होत आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tractor driver dares to dearing in Rahuri taluka