नगर जिल्ह्यात पहिल्यांदाच ‘असं’ घडलय..; बैलांसह ट्रॅक्टरलाही आणले मिरवणूकीला

आनंद गायकवाड
Thursday, 20 August 2020

गावातील पाटील घराण्यात परंपरेने आलेली बैलपोळ्याच्या मिरवणूकीच्या मानाची परंपरा खंडीत करुन, वर्षभर शेतकऱ्यांच्या शेतावर आपल्या बैलांसह मशागतीची कामे करणाऱ्या शेतमजूरांना पोळ्याचा मान दिला जातो.

संगमनेर (अहमदनगर) : गावातील पाटील घराण्यात परंपरेने आलेली बैलपोळ्याच्या मिरवणूकीच्या मानाची परंपरा खंडीत करुन, वर्षभर शेतकऱ्यांच्या शेतावर आपल्या बैलांसह मशागतीची कामे करणाऱ्या शेतमजूरांना पोळ्याचा मान दिला जातो. या गावाने आदर्श परंपरा निर्माण केली आहे.

बदलत्या काळात शेतीच्या मशागतीसाठी पारंपरिक बैलांचा वापर कमी झाला आहे. मात्र या पार्श्वभुमिवर शेतीच्या यांत्रिकीकरणात वाढ झाल्याने, तालुक्यात ट्रॅक्टरची संख्या वाढली आहे.

शेतकऱ्यांचा पारंपरिक उत्सव असलेला पोळा कोरोनामुळे सरकारच्या नियम व अटींचे पालन करुन तालुक्यातील वाघापूर, खराडी व रायते या परिसरामध्ये बैलांसह ट्रॅक्टर पोळ्याचे आयोजन केले होते.

साधारणपणे सर्व गावात पोळ्याचा मान गाव पाटलांच्या बैलांना असतो. मात्र या गावांमध्ये शेतीची खऱ्या अर्थाने मशागत करणाऱ्या शेतमजूरांच्या बैलांना पोळ्याचा प्रथम दर्शनाचा मान देण्यात आला. शासनाच्या नियमांचे पालन करुन या तीनही गावातील बैलजोड्यांसह प्रत्येक गावातील ट्रॅक्टर सजवून आणण्यात आले होते. गावातील ग्रामदैवत असलेल्या मारुतीच्या दर्शनाने हा सण साजरा करण्यात आला. गो कोरोनाचा संदेश अंगावर रंगवलेली बैलजोडी अनेकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली होती.

पारंपरिक सण व उत्सव काळाच्या ओघात मागे पडत चालले आहेत. श्रावणातील पोळा हा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा सण समजला जातो. मात्र शेतीच्या यांत्रिकीकरणामुळे बैलांची संख्या कमी होत आहे. पुढील पिढीला या परंपरेची माहिती असावी यासाठी परिसरातील सर्वांना बैल व ट्रॅक्टर सजवून आणण्याचे आवाहन केले होते. मात्र कोविडमुळे यात फारसा उत्साह बघायला मिळाला नाही.

पुढील वर्षी धामधुमीत हा उत्सव साजरा करणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते अँड. नानासाहेब शिंदे यांनी दिली. या वेळी सरपंच शिवाजी शिंदे, सुनील शिंदे, उल्हास जाधव, मारुती तुपे, दगडू शिंदे, संतोष दिघे, प्रभाकर शिंदे, रंगनाथ रोहम, कोंडाजी शिंदे आदींसह मोठ्या संख्येने युवा कार्यकर्ते उपस्थित होते. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tractor procession with oxen in Sangamner taluka