esakal | कोरोना बाधित आढळताच व्यापाऱ्यांनी केला बाजार बंद 

बोलून बातमी शोधा

telikhunt

कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी मार्केटयार्ड, आडतेबजार, दालमंडई, तपकिरगल्ली, दाणेडबरा व जवळील परिसरातील व्यापार पेठ रविवार (ता. 28) ते मंगळवार (ता. 30)पर्यंत तीन दिवस बंद राहणार आहे.

कोरोना बाधित आढळताच व्यापाऱ्यांनी केला बाजार बंद 
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर : आडतेबाजारातील एक व्यक्‍ती कोरोना बाधित आढळून आली. त्यामुळे रविवार ते मंगळवार तीन दिवस शहरांतील व्यापार पेठ बंद ठेवण्याचा निर्णय दि अहमदनगर आडते बाजार मर्चन्ट्‌स असोसिएशनतर्फे घेण्यात आला असल्याची माहिती असोसिएशनचे सचिव संतोष बोरा व राजेंद्र चोपडा यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे. 

प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे प्रशासनावर अधिक ताण येत आहे. आजपर्यंत प्रशासनाने व्यापाऱ्यांना भरपूर सहकार्य केले आहे. ही बाब लक्षात घेऊन कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी मार्केटयार्ड, आडतेबजार, दालमंडई, तपकिरगल्ली, दाणेडबरा व जवळील परिसरातील व्यापार पेठ रविवार (ता. 28) ते मंगळवार (ता. 30)पर्यंत तीन दिवस बंद राहणार आहे. व्यापाऱ्यांनी स्वयंफुर्तीने तीन दिवसाचा व्यापार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे पत्रकात म्हटले आहे. 

नगर ही जिल्ह्याची बाजारपेठ आहे. नगर शहरात मागील दोन ते तीन दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. व्यापाऱ्यांनी बंद पाळण्याचे जाहीर करण्यापूर्वीच नगर शहरात आज सहा रुग्ण आढळून आले. यात एक रुग्ण आडतेबाजार येथील आहे. यापूर्वी सिद्धार्थनगरमध्ये आढळून आलेला एक कोरोना बाधित रुग्ण कापडबाजारातील एका दुकानात काम करत होता. त्यामुळे बाजारपेठेत सध्या कोरोनाची दहशत निर्माण झाली आहे.

पोलिस प्रशासनाकडून आज दुपारी 12 वाजताच्या सुमारास नवीपेठ तेलीखुंट परिसरातील दुकाने बंद करण्याचे आवाहन दुकानदारांना करण्यात आले. त्यानुसार दुकानदारांनी आपली दुकाने तात्काळ बंद केली. शहरातील वाढता कोरोनाचा प्रभाव पाहता जिल्हा प्रशासन लॉकडाउनचे नियमांची कडक अंमलबजावणी करू लागले आहे. कापड बाजारातही पोलिस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कापडबाजारात येणाऱ्या ग्राहकांचे व्हिडिओ चित्रीकरणही पोलिसांकडून करण्यात येत होते.