esakal | गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटकला प्रवराकाठचे दूध, शेतकऱ्यांच्या गोठ्यावर जाऊन गायी खरेदी
sakal

बोलून बातमी शोधा

Traders from Gujarat, Madhya Pradesh and Karnataka came to Pravaranagar to buy cows

लॉकडाउनमध्ये बराच काळ जनावरांचा बाजार बंद होता. दुधाचे भाव पडले होते. त्यामुळे संकरित गायींचे भावही कमी झाले होते.

गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटकला प्रवराकाठचे दूध, शेतकऱ्यांच्या गोठ्यावर जाऊन गायी खरेदी

sakal_logo
By
सतीश वैजापूरकर

शिर्डी ः दुधाच्या भाववाढीबरोबरच संकरित गायींच्या किमतीही वाढल्या आहेत. या गायींचा राज्यातील सर्वांत मोठा बाजार, अशी लोणीच्या आठवडे बाजाराची ओळख आहे. या बाजारात काल (बुधवारी) दुधाळ होस्टन गायीच्या किमती एक ते सव्वा लाखांपर्यंत जाऊन पोचल्या.

ही दहा महिन्यांतील सर्वाधिक किंमत आहे. या गायींना सध्या गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र व कर्नाटकातून मागणी आहे. व्यापारी शेतकऱ्यांच्या गोठ्यात जाऊन गायी खरेदी करतात. प्रवरा खोऱ्यातील शेतकरी उत्तम प्रतीच्या संकरित गायींची पैदास करतात.

उत्तर नगर जिल्ह्याच्या विविध भागांतील शेतकरी त्यात आघाडीवर आहेत. काही शेतकरी दुधाच्या उत्पादनाऐवजी दुधाळ होस्टन गायींचे संगोपन करतात. त्या व्यायला झाल्या, की बाजारात विक्रीस आणतात. दहापेक्षा अधिक गायींचे संगोपन करणाऱ्या शेतकऱ्यांना गोठ्यातील गायींची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी व त्यांचे सरासरी वयोमान टिकविण्यासाठी दर वर्षी काही गायी किंवा कालवडी विकाव्या लागतात. व्यापारी त्या खरेदी करून लोणीच्या आठवडे बाजारात विक्रीसाठी आणतात.

हेही वाचा - दिग्गज सुटले, कर्डिलेच तेवढे अडकले

लॉकडाउनमध्ये बराच काळ जनावरांचा बाजार बंद होता. दुधाचे भाव पडले होते. त्यामुळे संकरित गायींचे भावही कमी झाले होते. दुधाळ संकरित गायींचे भाव वाढू लागल्याने आता शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 

या बाबत माहिती देताना बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर म्हणाले, ""आठवडे बाजारात उत्तम प्रतीच्या गायी एक ते सव्वा लाख रुपयांपर्यंत विकल्या गेल्या. त्यांच्या खरेदीसाठी गुजरात, आंध्र प्रदेश व कर्नाटकातील व्यापारी आले होते. दोन हजार गायींची विक्री झाली. अन्य जनावरांची खरेदी-विक्री लक्षात घेता, कालच्या बाजारात पाच कोटी रुपयांची उलाढाल झाली. 
 

अनेक वर्षांची परंपरा, आवश्‍यक त्या सर्व पायाभूत सुविधा आणि संकरित गायींमुळे शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला मोठा हातभार लागतो. सामान्य शेतकरी आणि शेतमजूरही या व्यवसायात आहेत. जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या नगण्य आहेत. राहाता बाजार समितीच्या माध्यमातून या बाजारात शेतकऱ्यांचे हित जपण्यास आपण नेहमी प्राधान्य देत आलो आहोत. 
- राधाकृष्ण विखे पाटील, आमदार 

संपादन - अशोक निंबाळकर

loading image