esakal | Video : मोहाची दारू स्कॉचपेक्षाही महाग...पुणे-मुंबईकरांच्या आदिवासी पाड्यात चकरा
sakal

बोलून बातमी शोधा

In the tribal areas of Pune-Mumbaikar for Moha liquor

मोहाच्या मद्यासाठी पुण्या-मुंबईतील लोकांच्या अकोल्यासारख्या दुर्गम भागात चकरा सुरू आहेत. लॉकडाउन असतानाही ते मोहासाठी रिस्क घेत आहेत. 

Video : मोहाची दारू स्कॉचपेक्षाही महाग...पुणे-मुंबईकरांच्या आदिवासी पाड्यात चकरा

sakal_logo
By
शांताराम काळे

अकोले: मोहाच्या फुलांची मद्यप्रेमींना भुरळ पडली आहे. व्हिस्की नको, रम नको, बियर तर नकोच नको पण मोहाची हवी. अचानक वाढलेल्या मागणीमुळे दोनशे रूपयांची बाटली एक हजारावर गेली आहे. प्रसंगी ती दीड हजार रूपये देऊन मोजली जातात. काही वेळा तर मागेल ती रक्कम देतात. अर्थातच ही दारू गोरगरीब थोडेच पितात.

मोहाच्या मद्यासाठी पुण्या-मुंबईतील लोकांच्या अकोल्यासारख्या दुर्गम भागात चकरा सुरू आहेत. लॉकडाउन असतानाही ते मोहासाठी रिस्क घेत आहेत. यामुळे मोहाच्या दारूची भट्टी लावणाऱ्यांची सध्या चार पैसे मिळत आहेत.  

आदिवासी भाग असलेल्या व ठाणे व पुणे, नाशिक  जिल्ह्याच्या हद्दीवरून फुले व मोहाची दारू येते. रात्रीच्या अंधारात घाट व डोंगरदऱ्या तुडवत आदिवासी, ठाकर, कातकरी, भिल्ल समाजाचे काही लोक ही दारू विकत आहेत. लॉकडाउनमध्ये उपासमार होत असल्याने हा पारंपरिक व्यवसाय सुरू केला आहे.मात्र, यातही काहीजण काळाबाजार करतात. मोहाच्या नावाखाली दुसरीच दारू देतात. स्कॉच , व्हिस्की पिणारेही आता  कोरोना व लॉकडाउन असल्याने मोहाच्या प्रेमात पडल्याचे चित्र आहे . स्कॉचमध्येही मोहाची फुले वापरली जातात. आयुर्वेदात त्या पुलांना फार महत्त्व आहे.

मोहाभोवती आदिवासी परंपरा

आदिवासी रोजगाराच्या दृष्टीने हिरडा, बेहडा, आवळा याबरोबरच मोहाची फुलेही तितकेच महत्वाची आहेत. मोह हे आदिवासी भागातील लोकांचे उदरनिर्वाहाचे साधनच जणू. त्यामुळे मोहाला आदिवासी देव मानतात. या झाडाला काही आदिवासी जमाती देव मानतात. या झाडाखाली त्यांचा देव मांडतात. बहुतेक आदिवासींचे सण/धार्मिक कार्यक्रम या झाडाच्या फुलांपासून बनविलेल्या दारूशिवाय (मोहाची दारू) पूर्ण होत नाहीत. होळी सण साजरा करून फुले गोळा करण्याला सुरुवात करतात. मोहाची फुले पहाटे गोळा करतात. ती वाळवून, साठवून ठेवतात. रोख पैशांची गरज असेल तेव्हा बाजारात विकतात.

मोहाचे तेल खाण्यासाठी...

मोहाच्या फळामध्ये असणाऱ्या बीजाला टोळी असे म्हणतात. या बीजापासून तेल काढले जाते. पूर्वीच्या काळी ते खाण्यासाठी मध्य भारतातील आदिवासी हेच तेल वापरत असत. अजूनही या भागातील गरीब लोक हे तेल वापरतात. फुले व फळे मार्च ते मे या कालावधीत मिळतात. या झाडाची मुळे व फांद्या इंधन म्हणून वापरतात. मोहाचे लाकूड मोठे असते, पण जास्त काळ टिकत नाही. मोहफुले मार्च महिन्यात येतात.

मोहापासून साबण आणि तेल

देवा-धर्मात, औषधात मोहफुलांचा फार उपयोग होतो. या फुलांपासून दारूही काढतात. टोळ म्हणजे मोहाच्या झाडाचे फळ आहे. या टोळीचे तेल काढतात. दिवा लावायला व खाण्यासाठी हे तेल वापरतात. पण टोळीचे तेल गरम खाल्ले तर चांगले असते. थंड झाल्यास त्याचा खवट वास येतो. टोळीच्या आतल्या बियांपासून साबण बनवतात. टोळीचा जेवणात बराच उपयोग होतो. मोहाचे फुल पौष्टिक आहे; म्हणून ते गरोदर बाईला, आजारी माणसाला ते खायला देतात. मोहाने पोट भरते. मोह पथ्यावर चालते. कारण मोह गरम आहे.

उदरनिर्वाहाचे साधन

मोहाने खोकला होत नाही. एप्रिल महिन्यात फळे येण्यास सुरुवात होत असते. मे ते जुलै या कालावधीत फळे परिपक्व गळून पडतात. या फळाला ग्रामीण भागात दोडा म्हणून संबोधले जाते. ही फळे परिपक्व झाल्यानंतर माणसे, जनावरे, शेळ्या-मेंढ्या, माकडे, पोपट खातात. या फळातील बिया गोळा करण्यासाठी लोक भल्या सकाळी जातात. या बिया गोळा करणे हे तर एक उदरनिर्वाहाचे साधन आहे. हे मद्यार्क काही औषधामध्ये वापरतात. याचा इंधन म्हणूनही वापर करण्यावर संशोधन चालू आहे.

अधिकृत करा व्यवसाय

सरकार दारूच्या विक्रीतून सर्वाधिक महसूल मिळतो. त्यामुळे सरकारने वॉईन शॉप सुरू करण्यास परवानगी दिली होती.  मोहाच्या फुलांपासून दारू गाळली जाते. हा व्यवसाय अधिकृत नाही. आदिवासींना या व्यवसायातून चार पैसे मिळतात. सरकारने एक तर उद्योगाला परवानगी द्यावी किंवा जी मोहाची फुले आहेत त्याची खरेदी करावी आणि त्यातून दारू तयार करावी, यामुळे आदिवासींनाही रोजगार मिळेल आणि सरकारलाही टॅक्स मिळेल.

-डॉ .भाऊराव उघडे, अकोले