तृप्ती देसाईंची शिर्डीची वाट बिकट, प्रांताधिकाऱ्यांनी काढली मनाई नोटीस

सतीश वैजापूरकर
Tuesday, 8 December 2020

भाविकांनी केलेल्या विनंती वरून ते लावण्यात आले आहेत. त्यामुळे ते हटविण्याचा प्रश्नच येत नाही,' असे साईसंस्थानने पोलिसांना कळविले होते. त्यातच, देसाई शिर्डीत आल्या तर त्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा शिवसेनेच्या महिला आघाडीच्या स्वाती सुनील परदेशी यांनी दिला होता.

शिर्डी ः भाविकांनी सभ्य पोशाख परिधान करून साईसमाधीच्या दर्शनासाठी यावे, अशा आशयाचे साईसंस्थानचे फलक काढून टाकण्याचा इशारा देणाऱ्या तृप्ती देसाई यांना, पुढील दोन दिवस शिर्डीत येण्यास मनाई करण्यात आली आहे. प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी याबाबतची नोटीस जारी केली. 

कायदा- सुव्यवस्थेस बाधा येऊ नये, यासाठी नऊ ते अकरा डिसेंबरदरम्यान देसाई यांना येथे येण्यास मनाई करण्यात आली आहे. "पोशाखाबाबतचे फलक साईसंस्थानने हटवावेत, अन्यथा गुरुवारी (ता. 10) शिर्डीत येऊन आपण फलक हटवू,' असा इशारा देसाई यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिला होता. मात्र, "हे फलक पूर्वीपासून आहेत.

भाविकांनी केलेल्या विनंती वरून ते लावण्यात आले आहेत. त्यामुळे ते हटविण्याचा प्रश्नच येत नाही,' असे साईसंस्थानने पोलिसांना कळविले होते. त्यातच, देसाई शिर्डीत आल्या तर त्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा शिवसेनेच्या महिला आघाडीच्या स्वाती सुनील परदेशी यांनी दिला होता. या सर्व घडामोडींची दखल घेऊन देसाई यांना येथे येण्यास मनाई करण्याची नोटीस बजावण्यात आली असल्याचे प्रांताधिकारी शिंदे यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

प्रांताधिकारी शिंदे यांनी जारी केलेली नोटीस देसाई यांना बजावल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक संजय सातव यांनी दिली. 

संस्थानला 15 हजार भाविकांचा पाठिंबा 
फलकावरून वाद निर्माण झाल्यावर साईसंस्थानने भाविकांची मते अजमावली. गेल्या चार दिवसांत दर्शनासाठी आलेल्या तब्बल पंधरा हजार भाविकांनी, दर्शनबारीतील अभिप्राय वहीत साईसंस्थानच्या बाजूने कौल दिला, तर 93 भाविकांनी देसाई यांच्या भूमिकेस पाठिंबा दिला. साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी आज ही माहिती जाहीर केली. 

अहमदनगर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Trupti Desai barred from coming to Shirdi