डिग्रसच्या उपसरपंचावर १२ सदस्यांकडून अविश्‍वास प्रस्ताव; मंगळवारी विशेष सभा

विलास कुलकर्णी
Sunday, 27 December 2020

डिग्रस येथे ग्रामपंचायतीचे उपसरपंच मधुकर पवार यांच्यावर 17 पैकी 12 सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे.

राहुरी (अहमदनगर) : डिग्रस येथे ग्रामपंचायतीचे उपसरपंच मधुकर पवार यांच्यावर 17 पैकी 12 सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. त्यावर मंगळवारी (ता. 29) सकाळी १० वाजता डिग्रस ग्रामपंचायत कार्यालयात तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी विशेष सभा बोलावली आहे. 

डिग्रस ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक अडीच वर्षांपूर्वी झाली. जनतेतून पोपट बर्डे पाच वर्षासाठी सरपंचपदी विजयी झाले. प्रत्येक वर्षी नवीन उपसरपंच निवडण्याचे सदस्यांच्या बैठकीत ठरले. पहिले उपसरपंच अनिल शिंदे यांनी दीड वर्षानंतर राजीनामा दिला. रिक्त पदासाठी निवड सभेत मधुकर पवार यांची उपसरपंच म्हणून निवड झाली. त्यांचा एक वर्षाचा ठरल्याप्रमाणे कार्यकाळ संपला. परंतु, त्यांनी पहिल्या उपसरपंचाप्रमाणे दीड वर्षाचा कार्यकाळ मिळावा. असा आग्रह धरला. त्यामुळे, सदस्यांमध्ये नाराजी पसरली.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
उपसरपंच मधुकर पवार पदाचा दुरुपयोग करून, सदस्यांना विश्वासात न घेता ग्रामपंचायतीमध्ये मनमानी पद्धतीने कारभार करतात. शासकीय योजना राबवित नसल्याने गावाला विकासापासून वंचित ठेवले. मासिक सभेत केलेल्या ठरावांची अंमलबजावणी करीत नाहीत. असा ठपका ठेवण्यात आला आहे. अविश्वास प्रस्तावावर ग्रामपंचायत सदस्य अविनाश भिंगारदे, ज्ञानेश्वर भिंगारदे, संतोष बेल्हेकर, अनिता भिंगारदे, अश्विनी ओहोळ, सुनिता गावडे, गोरक्षनाथ देशमुख, अंजली साळुंके, रावसाहेब पवार, रंजना कसबे, मंगल आघाव, ज्योती पवार यांच्या सह्या आहेत.

प्रस्ताव मंजूर होण्यासाठी तेरा सदस्यांची गरज आहे. बारा सदस्यांच्या सह्या झाल्या आहेत. सदस्य अनिल शिंदे, सोनाली बेल्हेकर, सुनिता जाधव, लता गिरगुणे यांनी प्रस्तावावर सह्या केलेल्या नाहीत. त्यामुळे, अविश्वास प्रस्ताव मंजूर होणार की बारगळणार याकडे तालुक्याचे लक्ष वेधले आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tuesday meeting in Digras Gram Panchayat