esakal | नगर तालुक्यातील बॉम्बस्फोटात दोनजण जखमी

बोलून बातमी शोधा

नगर तालुका बॉम्ब स्फोट
नगर तालुक्यातील बॉम्बस्फोटात दोन जखमी
sakal_logo
By
अशोक निंबाळकर

नगर तालुका : नारायणडोहो (ता. नगर) येथील एका शेतवस्तीवर झालेल्या बॉम्बस्फोटात दोन जण जखमी झाले. बुधवारी (ता. 28) सायंकाळी ही घटना घडली. वाळुंज, पारगाव, उक्कडगाव, दहिगाव, सारोळा बद्दी शिवारात चार किलोमीटर परिसरात स्फोटाचे हादरे जाणवले. सुदैवाने बॉम्बमधील रसायनाचा भडका उडाला नाही. त्यामुळे जीवितहानी टळली.

याबाबतची माहिती अशी ः नगर तालुक्‍यातील नारायणडोहो शिवारात बाबासाहेब रामराव फुंदे यांच्या वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर मुरूम टाकण्यात आला. दरम्यान, शेतात गवत काढण्यासाठी गेलेल्या फुंदे यांच्या पत्नी मंदाबाई यांना शेतातील कडुनिंबाच्या झाडाखाली मुरमात लोखंडी चेंडूसारखा बॉम्ब सापडला. त्यांनी शेतात काम करीत असलेल्या अक्षय साहेबराव मांडे या युवकाकडे तो दिला.

अक्षयने तो क्रिकेटच्या चेंडूसारखा दोन-तीन वेळा हातात खालीवर फेकत झेलला. बॉम्ब जमिनीवर आपटताच त्याचा स्फोट झाला. यात अक्षयच्या बरगडीला व मंदाबाई फुंदे यांच्या हाताला जखमा झाल्या.

घटनेची माहिती मिळताच नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर बॉम्बशोधक पथकाने परिसराची पाहणी केली. या परिसरात आणखी काही बॉम्ब आहेत का, याची तपासणी पथकाने केली; मात्र बॉम्ब आढळून आले नसल्याचे पथकाने सांगितले.