ब्राह्मणी योजनेत आणखी दोन गावे, दरडोई मिळणार 55 लिटर पाणी

विलास कुलकर्णी
Friday, 25 December 2020

मंत्री तनपुरे यांनी योजनेत चेडगाव व मोकळ ओहळ या दोन गावांचा समावेश करून, योजनेचा प्रकल्प अहवाल सात गावांसाठी तयार करण्याच्या सूचना केल्या.

राहुरी : ब्राह्मणी व इतर चार गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या प्रस्तावात आमुलाग्र बदल केला आहे. नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या प्रयत्नाने योजनेत आणखी दोन गावांचा समावेश केला. त्यामुळे आता ही योजना सात गावांसाठी होणार आहे.

या योजनेतून प्रतिदिन दरडोई 40 ऐवजी 55 लिटर पाणीपुरवठा केला जाईल. योजनेला येत्या दोन महिन्यांत तांत्रिक मान्यता मिळेल, असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता मोहन सराफ यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

सराफ म्हणाले, ""राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत ब्राह्मणी व इतर चार गावे प्रादेशिक पाणीयोजनेस 24 जून 2019 रोजी प्रशासकीय मंजुरी मिळाली. परंतु, आचारसंहिता लागू झाल्याने कामाची निविदाप्रक्रिया राबविता आली नाही.

योजनेची आखणी दरडोई 40 लिटरप्रमाणे केली होती. राज्यात नोव्हेंबर-2019अखेर जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत योजनांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला होता.'' 

दरम्यान, 30 जानेवारी 2020च्या शासन परिपत्रकाप्रमाणे 55 लिटर दरडोई निकषांप्रमाणे योजना संकल्पित करून फेरमान्यता घेण्याविषयी सूचना प्राप्त झाल्या. योजनेत ब्राह्मणी, उंबरे, पिंप्री अवघड, सडे, कुक्कडवेढे या गावांचा समावेश होता.

हेही वाचा - मंत्री गडाखांमुळे शनिदेवस्थानची राजकीय साडेसाती संपली

मंत्री तनपुरे यांनी योजनेत चेडगाव व मोकळ ओहळ या दोन गावांचा समावेश करून, योजनेचा प्रकल्प अहवाल सात गावांसाठी तयार करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार योजनेचा प्रकल्प अहवाल जीवन प्राधिकरणाच्या नगर कार्यालयातून मुख्य अभियंता, नाशिक यांच्या कार्यालयात मंजुरीसाठी सादर केला असल्याचे सराफ म्हणाले. 

नवीन योजनेसाठी 60 कोटी 57 लाख रुपये ढोबळ किंमतीचे अंदाजपत्रक व आराखडे तयार केले आहेत. प्रस्तावाची तांत्रिक तपासणी प्रगतिपथावर असल्याचे ते म्हणाले. 

ब्राह्मणी व इतर चार गावे योजनेच्या जुन्या आराखड्यात मुळा धरणातून 10 किलोमीटरची मुख्य जलवाहिनी एसडीपी प्रकारची होती. ती वारंवार फुटण्याचा धोका होता. नवीन योजनेत मुख्य जलवाहिनी लोखंडी (जीआय) केली जाणार आहे. 40 ऐवजी 55 लिटर दरडोई पाणी मिळेल. 
- डॉ. राजेंद्र बानकर, माजी उपसरपंच, ब्राह्मणी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two more villages are included in the Brahmani scheme