
नगरच्या दोघी गाजवणार आयपीएल
पाथर्डी / तळेगाव दिघे - बीसीसीआय आयोजित महिला टी-२० आयपीएल क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्ह्यातील दोन खेळांडूची निवड झाली आहे. पाथर्डी तालुक्यातील सात्रळ येथील आरती केदार व संगमनेर तालुक्यातील माया सोनवणे या दोघी व्हॅलासिटी स्क्वॉड या संघाकडून खेळणार आहेत. २३ ते २८ मेदरम्यान पुणे येथील एमसीएच्या मैदानावर या स्पर्धा होणार आहेत.
पाथर्डी तालुक्यातील आरतीने बीसीसीआयने नुकत्याच घेतलेल्या वरिष्ठ महिला टी-२० स्पर्धेत भेदक गोलंदाजीवर सर्वाधिक १५ बळी घेतले होते. यापूर्वी महाराष्ट्र संघाकडून खेळताना चमकदार कामगिरी केली होती. महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील संघात तिने अष्टपैलू कामगिरी करत विजयात सिंहाचा वाटा उचलला होता. २०२१ मध्ये झालेल्या वरिष्ठ महिला एकदिवसीय क्रिकेट सामन्यासाठीही तिची निवड झाली होती. ती शशिकांत निऱ्हाळी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.
संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरवच्या माया दत्तात्रय सोनवणे हिने गोलंदाजीने क्रिकेटचे मैदान गाजवले. सुरत येथे झालेल्या वरिष्ठ महिला टी-२० स्पर्धेतील अंतिम सामन्यात मायाने रेल्वेविरुद्ध महत्त्वपूर्ण दोन बळी घेतले. साखळी सामन्यातही प्रभावी कामगिरी केली. आंध्रप्रदेश आणि केरळ विरुद्ध चार बळी घेतले. लेग स्पिन गोलंदाजी करत वरिष्ठ महिला टी-२० स्पर्धेत ११ बळी घेतले. ११ व्या वर्षीच मायाची महाराष्ट्र संघात निवड झाली. माया सोनवणे ही सामान्य कुटुंबातील असून, सिन्नर येथील सुनील कानडी यांच्यामुळे क्रिकेटकडे वळली. तिला जिल्हा क्रिकेट संघटनेचे ज्येष्ठ प्रशिक्षक स्वर्गीय अविनाश आघारकर यांचे मार्गदर्शन लाभले.
लहानपणा-पासून क्रिकेटची आवड आहे. सर्वांच्या पाठिंब्यामुळे आयपीएल-मध्ये पोहोचले आहे. या स्पर्धेत चांगली कामगिरी करणार आहे. यातून भारतीय संघात निवड होण्यासाठी दमदार कामगिरी करणार आहे.
- आरती केदार, पाथर्डी.
सर्वांचे मार्गदर्शन आणि कठोर परिश्रमामुळे मी येथपर्यंत पोहोचले आहे. महिला आयपीएल टी-२० स्पर्धेत चांगली कामगिरी करणार आहे. मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेणार आहे. भारतीय संघात खेळण्याचे माझे स्वप्न आहे.
- माया सोनवणे, संगमनेर.
Web Title: Two Players Selected From Nagar District For Womens T20 Ipl Cricket Tournament
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..