esakal | दोन हजार कोटी आले नगर-टेंभुर्णी महामार्गासाठी, आता लढाई श्रेयासाठी
sakal

बोलून बातमी शोधा

Two thousand crore sanctioned for Nagar-Tembhurni highway

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी दिल्याने हे दोन्ही महत्वाकांक्षी रस्ते मार्गी लागणार आहेत. या रस्त्यांमुळे कर्जत,जामखेड, श्रीगोंद्यासह शेजारील करमाळा, नगर तालुक्यांनाही मोठा फायदा होणार आहे.

दोन हजार कोटी आले नगर-टेंभुर्णी महामार्गासाठी, आता लढाई श्रेयासाठी

sakal_logo
By
वसंत सानप

जामखेड : जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग 548 (ड्) मधील आढळगाव ते जामखेड या 62.77 किलोमीटर दुपदरी महामार्गाच्या कामासाठी 399.33 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. नगर-करमाळा-टेंभूर्णी महामार्गासाठी 2000 हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचे ट्विट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

आता या मार्गांसाठी निधी दिल्याने भाजपसोबत राष्ट्रवादीच्याही पदाधिकाऱ्यांनी आपणच कसा या कामासाठी पाठपुरावा केला होता. यासाठी श्रेयवाद सुरू झाला आहे. त्यासाठी सोशल मीडियातून धुमाकूळ सुरू झालाय.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी दिल्याने हे दोन्ही महत्वाकांक्षी रस्ते मार्गी लागणार आहेत. या रस्त्यांमुळे कर्जत,जामखेड, श्रीगोंद्यासह शेजारील करमाळा, नगर तालुक्यांनाही मोठा फायदा होणार आहे. हे राष्ट्रीय महामार्ग असल्याने इतर राज्यांतील वाहनधारकांना त्याचा फायदा होणार आहे. 
 
न्हावरा फाटा -इनामगाव-काष्टी
श्रीगोंदा- जळगाव-जामखेड या राज्यमहामार्गाला नुकताच 'राष्ट्रीय महामार्गा' चा दर्जा प्राप्त झाला असून या मार्गातील आढळगाव ते जामखेड या 62.77 किलो मीटर अंतराच्या दुपदरी महामार्गाच्या कामासाठी व नगर-सोलापूर 516 (अ) या नवीन चौपदरी राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठीही दोन हजार कोटींची तरतूद झाली. तसे ट्विट दस्तुरखुद्द केंद्रीय दळण-वळण मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षांपासून कागदावर असलेली ही योजना आता प्रत्यक्षात साकरण्याचा मार्ग मोकळा झाला. 

नगर -सोलापूर व आढळगाव ते जामखेड हे दोन्ही राष्ट्रीय महामार्ग कर्जत-जामखेड या दोन तालुक्यातून जात असून या दोन्ही तालुक्या बरोबरच जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा मिळेल, अर्थकारणाला बळकटी येईल! या रस्त्यांच्या प्रश्नासाठी विद्यमान लोकप्रतिनिधी आमदार रोहित पवार, खासदार डॉ. सुजय विखे , माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन निवेदन दिले होते, असा दावा केला आहे. संबंधितांसोबत घेतलेले फोटो व बैठकांचा तपशील सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

अखेर या पाठपुराव्याला यश आले आहे. सदरचे महामार्ग 18 महिन्यांच्या कालावधीत पूर्ण होणार आहे. काम पूर्ण झाल्याच्या तारखेपासून 10 वर्षे त्याच्या डागडुजीचा कालावधी निश्चित करण्यात आलाय. पुढील काळात या महामार्गांमुळे या भागात मोठा कायापालट होईल. रस्ता मंजुरीसाठी एवढी तसदी घेतली, आता चांगले काम करून घेण्यासाठी झटावे, अशा प्रतिक्रिया येत आहेत. 

"हे राष्ट्रीय महामार्ग तालुक्याच्या विकासासाठी महत्वाचे ठरतील. नगर- सोलापूर व आढळगाव ते जामखेड रस्त्याच्या कामांसाठी मी सातत्यानं केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील या महामार्गासाठी निधी मिळावा;याकरिता लक्ष घातले होते. तसेच काही दिवसांपूर्वी आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन मतदारसंघातील रस्त्यांसाठी निधीची मागणी केली होती. जनतेच्या मागणीचा मान राखत त्यांनी भरीव निधी मंजूर केला. या बाबत माझ्या मतदारसंघातील नागरिकांच्यावतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार. या रस्त्यामुळे नागरिकांची गैरसोय दूर होण्यास निश्चित मदत होईल.’’
- आमदार रोहित पवार.

"आपण पालकमंत्री असताना या दोन्ही महामार्गांसाठी केद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. न्हावरा फाटा ते जामखेड या रसत्याच्या कामाचा पहिला टप्पा यापूर्वीच झाला आहे. दुसऱ्या टप्यातील कामासाठी 400 कोटी रुपये तर नगर करमाळा महामार्गासाठी 2000 कोटी रुपये मंजूर झाले; याकरिता आपण स्वतः तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बरोबर घेऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. खासदार डॉ. सुजय विखेंनीही पाठपुरावा केला होता. त्यामुळे या महामार्गाचे श्रेय अन्य कोणी घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करु नाही."
- राम शिंदे; माजी मंत्री.

loading image