बापरे! नगरमधून सहा वर्षांत दोन हजारजण बेपत्ता, एक हजार महिला-मुलींचा समावेश

सतीश वैजापूरकर
Thursday, 17 December 2020

काही प्रसंगात दोघांपैकी एकाच्या विवाहबाह्य संबंधातून मूलं-बाळं मागे सोडून कुणी बेपत्ता होते. क्षुल्लक कारणावरून भांडणे होतात. त्यातून रागाने घर सोडून बेपत्ता होतात.

शिर्डी ः गेल्या सहा वर्षांत नगर जिल्ह्यातून तब्बल दोन हजार व्यक्ती बेपत्ता झाल्या. त्यात एक हजार विवाहिता व मुली, तसेच 900हून अधिक मुले, युवक व विवाहित पुरुषांचा समावेश आहे.

या तुलनेत बेपत्ता वृद्धांची संख्या कमी आहे. वाढलेला तामसीपणा, सुखासीन जीवनाची ओढ व बेरोजगारी, ही तीन प्रमुख कारणे त्यामागे आहेत. पोलिसांनी "ऑपरेशन मुस्कान'अंतर्गत बेपत्ता व्यक्तींचा शोध घेतला. त्यातील जवळपास 600 जण सापडले. कुटुंबीयांसोबत चर्चा करून त्यातील बहुतेकांना घरी पाठवण्यात आले.

हेही वाचा - हरिश्चंद्र गडावर प्रथमच सापडली श्रीरंगी वनस्पती

शहरात रस्त्यावर उभे राहून व्यवसाय करणाऱ्या 11 अल्पवयीन मुलांना पोलिसांनी आज ताब्यात घेतले. घरच्या मंडळींना समज देऊन मुलांना त्यांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर या मोहिमेचे जिल्ह्याचे प्रमुख पोलिस निरीक्षक बाजीराव पवार यांनी "सकाळ'शी बोलताना वरील निरीक्षण नोंदविले.

ते म्हणाले, ""पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांचे या मोहिमेवर सातत्याने लक्ष असते. ते या मोहिमेचा नियमित आढावा घेतात. जिल्ह्यातील काही तालुक्‍यांत अशिक्षित, कष्टकरी मुलींना सुखासीन जीवनाचे, लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून पळविले जाते. काही घटनांत विवाहित जोडप्यांत भांडणे झाल्याने, त्यातील एक जण घर सोडतो.

काही प्रसंगात दोघांपैकी एकाच्या विवाहबाह्य संबंधातून मूलं-बाळं मागे सोडून कुणी बेपत्ता होते. क्षुल्लक कारणावरून भांडणे होतात. त्यातून रागाने घर सोडून बेपत्ता होतात. तामसीपणात झालेली वाढ, सुखासीन जीवनाच्या ओढीतून घर व संसारावर पाणी सोडण्याची तयारी ठेवल्याचे दिसते. बेरोजगारी व गरीबीमुळे अनेक जण परागंदा होतात. बऱ्याचदा परस्परांवर विश्वास नसल्यानेदेखील संसारात अनर्थ घडतो.'' 

पूर्वी घरातील ज्येष्ठांचे कुटुंबावर नियंत्रण होते. आर्थिक व्यवहार त्यांच्या ताब्यात असत. ग्रामीण भागात अशी भांडणे मिटविण्यासाठी जाणती मंडळी पुढाकार घेत. गावात त्यांच्या शब्दाला मान होता. आता ही व्यवस्था नष्ट झाली. विभक्त कुटूंबांवर कुणाचे नियंत्रण राहिले नाही. किरकोळ वादातून घर सोडण्याच्या घटना घडतात.

कष्टकरी मुलींना सुखासीन जीवनाचे आमिष दाखविले जाते. त्यात अल्पवयीन मुलींची संख्या लक्षणीय आहे. आई-वडिलांच्या संपत्तीवरून वाद होतात. वाद टोकाला गेला, तर काही महिलांना घर सोडण्याची वेळ येते. आम्ही बेपत्ता झालेल्या लोकांचा शोध घेऊन त्यांना पुन्हा कुटुंबात सामाविण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी दोन्ही बाजूंची समजूत घालतो, असे पवार यांनी सांगितले. 

मुलांना भीक्षा मागायला लावतात 
पोलिस निरीक्षक बाजीराव पवार म्हणाले, की गरीबी व वाढत्या व्यसनाधिनतेमुळे हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांतील पालक आपल्या लहान मुलांना रस्त्यावर विविध व्यवसाय किंवा भिक्षा मागायला लावतात. शिर्डी व शिंगणापूर यांसारख्या देवस्थानी असे प्रकार आढळतात. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two thousand people go missing in Ahmednagar in six years