
घरकुलाचा काही भाग कोसळून दोन महिला जखमी झाल्याची घटना येथील प्रभाग 13 परिसरात नुकतीच घडली.
श्रीरामपूर (अहमदनगर) : घरकुलाचा काही भाग कोसळून दोन महिला जखमी झाल्याची घटना येथील प्रभाग 13 परिसरात नुकतीच घडली.
नगरपालिकेने १० वर्षांपूर्वी वाल्मिकी आंबेडकर आवास योजनेअंतर्गत शहरातील प्रभाग 13 मध्ये बांधलेल्या घरकुलाच्या बांधकामाचा सिमेंट काँक्रीटचा काही भाग कोसळल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या दुर्घटनेत यास्मीन मणियार आणि नजमा सय्यद जखमी झाल्या असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार केले आहे.
नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
सदर घरकुलाची यापुर्वी दोनवेळा पडझड झाली असून घरकुलाचे काम निकृष्ट झाल्याचा सवाल नगरसेविका वैशाली चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. झालेल्या दुर्घटनेला तत्कालिन पदाधिकारी, मुख्याधिकारी, बांधकाम अभियंता, गृहनिर्माण संस्थेचे संबंधित अधिकार्यांसह ठेकेदार जबाबदार आहे. घरकुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने सदर बांधकामाचा भाग कोसळत आहे. त्यामुळे याप्रकरणाची तातडीने चौकशी करुन संबधीतावर कडक कारवाई करण्याची मागणी नगरसेविका वैशाली चव्हाण आणि नगरसेवक दीपक चव्हाण यांनी केली आहे.
घरकुलाच्या निकृष्ट बांधकामाबाबत पालिकेसमोर यापुर्वी उपोषण केले होते. त्यावेळी पालिकेच्या बांधकाम विभागाचे राम सरगर यांनी घरकुलाची पहाणी करून अहवाल सादर केला होता. त्यामुळे निकृष्ट घरकुलाची तातडीने दुरुस्ती न झाल्यास मोठी जीवित हानी होण्याची भीती नगरसेवक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.
संपादन : अशोक मुरुमकर