
घटनेची माहिती समजताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. तिघांनाही पाण्यातून बाहेर काढून औषधोपचारासाठी घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात आणले.
संगमनेर ः तालुक्यातील झोळे गावा अंतर्गत असलेल्या गणेशवाडी येथील दगड खाणीच्या पाण्यात बुडून दोघा सख्ख्या अल्पवयीन भाच्यांसह, त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या मामाचा बुडाल्याने मृत्यू झाला.
आज दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. सूरज संतोष गाढवे ( वय 15 ), मयूर संतोष गाढवे ( वय 12 रा. कर्जुले पठार, ता. संगमनेर) व संजय भाऊसाहेब खर्डे ( वय 40, रा. गणेशवाडी, झोळे, ता. संगमनेर) अशी मृतांची नावे आहेत.
हेही वाचा - नेवाशातील मुस्लिम नवदाम्पत्याने जे केले ते तुम्हाला जमेल काय
या बाबत तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मयूर व सूरज संतोष गाढवे हे दोघे सख्खे भाऊ पठार भागातील कर्जुले पठार येथून गणेशवाडी ( झोळे ) येथील मामा संजय भाऊसाहेब खर्डे यांच्याकडे आले होते.
आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास शेळ्या चारण्यासाठी गणेशवाडी परिसरात गेले होते. त्या परिसरातील पावसाने भरलेल्या एका दगड खाणीतील पाण्यात शेळ्या धुत असताना, पाण्याचा अंदाज न आल्याने मयुर व सुरज हे दोघे भाऊ पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले. त्याच वेळी मामा संजय खर्डे भाच्यांना वाचवण्यासाठी गेले. मात्र, मामा व भाच्यांना पोहता येत नसल्याने त्या तिघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.
घटनेची माहिती समजताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. तिघांनाही पाण्यातून बाहेर काढून औषधोपचारासाठी घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र, त्यापूर्वीच ते मयत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात आणण्यात आले आहेत.
या प्रकरणी भाऊसाहेब कारभारी खर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार पी. एन. तोडकरी करीत आहेत.
संपादन - अशोक निंबाळकर