मंत्रालयात नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगार तरुणांना लाखोंचा गंडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fraud Crime News

मंत्रालयात नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगार तरुणांना लाखोंचा गंडा

राहुरी : मंत्रालयात नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगार तरुणांना लाखोंचा गंडा घातल्याच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी सैराट फेम प्रिन्स तथा सुरज पवार आज (शुक्रवारी) सायंकाळी चार वाजता वकीलांसह राहुरी पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाला. पोलिसांनी त्याचा जबाब नोंदविला. त्याला, येत्या सोमवारी रोजी पुन्हा चौकशीसाठी येण्याची नोटीस बजावून, रात्री आठ वाजता सोडून देण्यात आले.

महेश बाळकृष्ण वाघडकर (रा. भेंडा फॅक्टरी, ता. नेवासा) यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दोन लाखांची फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. त्यानुसार, दत्तात्रेय अरुण क्षीरसागर (रा. नाशिक), आकाश विष्णू शिंदे, ओंकार नंदकुमार तरटे (दोघेही रा. संगमनेर), विजय बाळासाहेब साळे (वय ३७, रा. खडांबे बु., ता. राहुरी) या आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे.

आरोपींनी वाघडकर यांच्या खोट्या नियुक्तीपत्रावर राजमुद्रेचा गोल व आडवा शिक्का मारलेला आढळला. शिक्के तयार करताना आरोपी शिंदे यांच्याबरोबर सुरज पवार होता. असे विनापरवाना शिक्के बनवून देणारा आरोपी तरटे याने चौकशीत सांगितले. त्यामुळे, प्रिन्स तथा सुरज पोलिसांच्या रडारवर आला. त्याला पोलीस ठाण्यात हजर होण्याची नोटीस काढून, पोलीस पथके शोध घेत होती.

प्रिन्स म्हणतो माझीच फसवणूक झाली..!

पोलिसांना जबाब नोंदवून दिल्यावर पत्रकारांशी बोलतांना प्रिन्स उर्फ सुरज म्हणाला, "गुन्ह्यातील आरोपी शिंदे याला ओळखतो. त्याने संगमनेर येथील चित्रपट निर्माते डॉ. डेरे यांच्या "संविधान" चित्रपटात भूमिका मिळवून दिली. चित्रपट पूर्ण झाल्यावर साडेसहा लाखांचे मानधन ठरले. करारावर सही केल्यावर तीन लाखांचा ॲडव्हान्स मिळाला. पैकी शिंदे याने दोन लाख रुपये घेतले. नंतर आणखी पन्नास हजार रुपये घेतले. चित्रपटाचे अर्धवट शूटिंग झाले. कोरोनामुळे चित्रपट रखडला.

प्रिन्स बरोबर आलेले ॲड. दीपक शामदीरे (पुणे) म्हणाले, "आरोपी शिंदे याने चित्रपटासाठी तयार केलेल्या शिक्क्यांचा गैरवापर केला. नोकरी देण्याच्या आमिषाने आर्थिक फसवणुक केली. या गुन्ह्याशी सुरज पवारचा कोणताही संबंध नाही. उलट आरोपी शिंदे याने त्याची अडीच लाखांची फसवणूक केली आहे. त्याचे नाहक नाव घेतल्याने बदनामी झाली. त्यामुळे काही चित्रपट निर्मात्यांनी त्याला भूमिकेतून वगळले."

तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सज्जन नार्‍हेडा म्हणाले, "प्रिन्स तथा सुरज पवार यांच्या बँकेच्या खात्यांमधील आर्थिक व्यवहारांची पडताळणी करण्यासाठी येत्या सोमवारी (ता. २६) पुन्हा चौकशीसाठी बोलविले आहे."

कोण आहे प्रिन्स?

सुरज बैलगंग्या पवार (वय २२, मुळ रा. करमाळा, जि. सोलापूर, हल्ली मु. कात्रज, जि. पुणे) याच्या वयाच्या तिसऱ्या वर्षी आईचे कर्करोगाने निधन झाले. वडिलांनी दुसरे लग्न केले. सुरज त्याच्या आजीकडे राहू लागला. वयाच्या चौथ्या वर्षी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी पिस्तुल्या चित्रपटात भूमिका दिली. त्यातील भूमिकेसाठी त्याला राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. नंतर फॅन्ड्री, सैराट अशा सुपरहिट चित्रपटांमधून त्याची भूमिका गाजली.

Web Title: Unemployed Youth Ministry Jobs Offer Fraud Sairat Fame Suraj Pawar Rahuri Police Station

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..