Video : वयाच्या २३ व्यावर्षी अभिषेक झाला अधिकारी; खासगी क्लासला बाय, स्वयं अध्ययनावर भर

गौरव साळुंके
Wednesday, 5 August 2020

बेलापूर येथील अभिषेक दिलीप दुधाळ हे २३ व्या वर्षी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.

श्रीरामपूर (अहमदनगर) : तालुक्यातील तालुक्यातील बेलापूर येथील अभिषेक दिलीप दुधाळ हे २३ व्या वर्षी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहिर झाला. त्यात अभिषेक यांनी ६३७ रॅक घेतली. या यशासाठी कुठलीही खासगी शिकवणीचा आधार घेतला नसल्याचे त्यांनी सांगितले.

बेलापूर येथील प्राथमिक शाळा व खटोड माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेतले. त्यानंतर मुंबई येथील वीर जिजामाता अभियांत्रिकी शिक्षण संस्थेत माहिती आणि तंत्रज्ञान विभागात पदवी प्राप्त केली.

पदवीनंतर आयटी क्षेत्रातील चांगली नोकरी सोडुन प्रशासकीय अधिकारी होण्याचा निर्धार केला. आणि दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयु) एम. ए. अर्थशास्त्र विभागासाठी त्यांनी प्रवेश घेतला. दिल्लीत गेल्यानंतर प्रारंभी खासगी क्लासला लावले परंतू पंधरा दिवसांत खासगी क्लासला बाय करुन स्वयं अध्ययनावर भर दिला. रोज सात तास नियमित अभ्यास करुन अवघ्या २३ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात त्यांनी अधिकारी होण्याचा मान पटकाविला. 

प्राथमिक शिक्षण मराठी माध्यमात झाले असुन प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी कुठलाही अडथळा आला नसल्याचे त्यांनी सांगितले. अभियंता होण्याचे वडिलांचे स्वप्न होते. परंतू पदवीनंतर प्रशासकीय अधिकारी होण्याची इच्छा होती. त्यासाठी सुरज थोरात यांची प्रेरणा मिळाली. थोरात हे आयकर विभागात वरिष्ठ अधिकारी असुन त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. तसेच प्राध्यापक व मित्र परिवाराचे मार्गदर्शन लाभले. खासगी शिकवणीपेक्षा स्वयं अध्ययनावर भर दिला. अभिषेक यांचे वडील येथील डहाणुकर माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक असल्याने त्यांची साथ मिळाली. तर आई संगीता दुधाळ गृहिणी असुन भाऊ प्रणव यंदा इयत्ता बारावीला आहे. या यशाबद्दल अभिषेक यांचे सर्वांनी अभिनंदन केले आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: upsc result 2019 Abhishek Dilip Dudhal success story in Shrirampur taluka