राजकीय खळबळ ः अर्बनचे संचालक सुरपुरियांना अटक, कमिशनर कृष्णप्रकाश यांची पुन्हा धडाकेबाज कारवाई

टीम ई सकाळ
Sunday, 7 March 2021

बॅंकेचे शाखा व्यवस्थापक महादेव पंढरीनाथ साळवे (वय 56, रा. नगर) यांनी 25 जानेवारी रोजी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

अहमदनगर : अर्बन बॅंकेच्या पिंपरी- चिंचवड (जि. पुणे) शाखेतील 22 कोटी रुपये कर्जाच्या गैरव्यवहारप्रकरणी बॅंकेचे संचालक नवनीत सुरपुरिया (रा. सोनई, ता. नेवासे) व कर्जदार यज्ञेश चव्हाण यांना पुण्यातील आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. 

चिंचवड येथील पॉवर हाऊस चौकात अर्बन बॅंकेची शाखा आहे. तेथून 26 मार्च 2018 ते 25 जानेवारी 2021 या काळात 22 कोटी रुपयांच्या कर्जवाटपात गैरव्यवहार झाला होता. कर्जदारांना कमी मूल्यांच्या मालमत्तेवर कर्ज उपसमितीने जास्त कर्ज दिले. त्याचे हप्ते नियमित भरले जात नव्हते.

बॅंकेचे व्हॅल्यूअर अभिजित नाथा घुले यांना संशय आल्याने त्यांनी कर्जप्रकरणाची कागदपत्रे मागवून घेतली. त्यावेळी मालमत्ता मूल्यांकनाचा अहवाल त्यांच्या बनावट सहीने सादर केल्याचे निदर्शनास आले. याबाबत घुले यांनी त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. 

बॅंकेचे शाखा व्यवस्थापक महादेव पंढरीनाथ साळवे (वय 56, रा. नगर) यांनी 25 जानेवारी रोजी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी बबन निवृत्ती चव्हाण, वंदना बबन चव्हाण, यज्ञेश बबन चव्हाण (तिघे रा. संभाजीनगर, चिंचवड), मंजूदेवी हरिमोहन तांबिले, रामचंद्र अण्णासाहेब तांबिले (रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड), अभिजित नाथा घुले (रा. नगर), कर्ज उपसमितीचे सदस्य, तसेच बॅंकेच्या संचालकांविरुद्ध फसवणूक करणे, बनावट कागदपत्रे खरी भासविणे आदी कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्‍त कृष्णप्रकाश यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक वसंत बाबर यांनी काल पहाटे नगर शहरात छापा घालून सुरपुरिया यांना अटक केली. बॅंकेच्या अन्य संचालकांना ही माहिती मिळताच ते पसार झाले आहेत. 

बॅंकेला पूर्ववैभव मिळेल : राजेंद्र गांधी 
बॅंकेतील बोगस कर्जप्रकरणी कारवाई सुरू झाली आहे. त्यामुळे बॅंकेच्या कर्जवसुलीला गती मिळाली आहे. त्यातून बॅंकेला निश्‍चितच पूर्ववैभव प्राप्त होईल, असा विश्‍वास माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी व्यक्‍त केला. 

नगरमध्ये खळबळ

गेल्या काही दिवसांपासून अर्बन बँक चर्चेचा विषय ठरली आहे. सुरपुरिया यांच्या अटकेने तत्कालीन ठपका ठेवलेले संचालक धास्तावले आहेत. राजेंद्र गांधी यांनी हे प्रकरण लावून धरले आहे. अटकेमुळे नगरमध्ये राजकीय खळबळ उडाली आहे.

कृष्णप्रकाश इज बॅक

पुण्याचे आयुक्त कृष्णप्रकाश यांनी पुन्हा नगरमध्ये धडाकेबाज कारवाई केली आहे. यापूर्वी त्यांनी नगरमध्ये एसपी असताना कोतकरला अटक केली होती. त्यामुळे पूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. आता पुन्हा त्यांची या निमित्ताने एन्ट्री झाली आहे. परिणामी गुन्हेगार धास्तावले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Urban Bank director Surpuria arrested