
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम 17 जानेवारीला राबविण्यात येणार आहे. त्याचे नियोजन प्रशासनाकडून सुरू आहे.
अहमदनगर : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम 17 जानेवारीला राबविण्यात येणार आहे. त्याचे नियोजन प्रशासनाकडून सुरू आहे.
पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला 1995पासून सुरवात झाली. 13 जानेवारी 2011नंतर देशात एकही पोलिओ रुग्ण आढळलेले नाही. त्यामुळे देशाला पोलिओ मुक्त झाल्याचे प्रमाणपत्र मिळालेले असले तरी ही मोहीम राबविण्यात येत आहे. राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम 17 जानेवारी 2011ला राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तीन लाख 75 हजार 937, शहरी भागातील 16 हजार 669 व महापालिका हद्दीतील 46 हजार 260 असे चार लाख 38 हजार 866 बालकांना पोलिओ लसीचे डोस पाजण्यात येणार आहेत.
या मोहिमेत बालकांना लसीकरण करण्यासाठी ग्रामीण भागात दोन हजार 782 बुथ, शहरी भागात 75 व महानगरपालिका क्षेत्रात 183 असे जिल्ह्यात तीन हजार 40 बुथवर सात हजार 850 कर्मचाऱ्यांमार्फत पोलिओ लसीचे डोस पाजण्यात येणार आहेत.
18 जानेवारीला तांत्रिक खंड घेऊन ग्रामीण भागात 19 जानेवारीपासून तीन दिवस व शहरी भागात सलग पाच दिवस घरोघरी जाऊन राहिलेल्या लाभार्थ्यांना शोधून पोलिओ डोस पाजण्यात येणार आहे. पोलिओपासून कोणी वंचित राहू नये, यासाठी 101 ट्रांझिट टीमद्वारे बस, रेल्वे स्टेशन, धार्मिक स्थळे आदी ठिकाणी व 131 मोबाईल टिमद्वारे ऊसतोड कामगार भटके लोक रस्त्यावरील मजुरी करणाऱ्या लोकांची मुले यांना पोलिओ लसीचे डोस पाजण्यात येणार आहेत. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा प्रयत्न करीत आहे.
पोलिओ डोस पाजला जाणारी बालके ः चार लाख 38 हजार 866
एकूण बुथ ः तीन हजार 40
नियुक्त कर्मचारी ः सात हजार 850
बसस्थानक व रेल्वेस्टेशनवर ः 101 ट्रांझिट टीम
मोबाईल टीम ः 131
संपादन : अशोक मुरुमकर