कोपरगावात गणेश मूर्ती फेकताना व्हिडिओ व्हायरल, नव्या वादाला तोंड

मनोज जोशी
Thursday, 3 September 2020

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शहरातील विविध 12 ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र स्थापन करण्यात आले होते. पालिकेच्या व मंडळांच्या विसर्जन रथाला प्रतिसाद देत आमच्या भावनांशी खेळू नका, त्याचा योग्य सन्मान ठेवत विसर्जन करा अशी अपेक्षा व्यक्त केली होती.

कोपरगाव : शहरात गणेश विसर्जनाच्या दिवशी संकलित करण्यात आलेल्या मूर्ती गोदावरी नदीपात्रात फेकून देतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.लपालिकेविषयी नाराजी, राजकीय पक्ष, नेत्यांचे खुलासे यामुळे गणेश विसर्जन मुद्दा ऐरणीवर आला आहे. 

ज्या व्यक्तींनी नदीपात्रात मुर्ती फेकून दिल्या त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी नदीपात्रात मुर्त्या फेकणारे नगरपालिकेचे कर्मचारी नाहीत. केवळ पालिकेला बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र असल्याचे सोशल मीडियावर म्हटले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शहरातील विविध 12 ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र स्थापन करण्यात आले होते. पालिकेच्या व मंडळांच्या विसर्जन रथाला प्रतिसाद देत आमच्या भावनांशी खेळू नका, त्याचा योग्य सन्मान ठेवत विसर्जन करा अशी अपेक्षा व्यक्त केली होती.

हेही वाचा - श्रीगोंदा बाजार समितीत राजीनामा सत्र

काल दिवसभर गोदावरी नदीपात्रातील पुलाजवळ गणेश मूर्ती नदीपात्रात फेकतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. मनसेचे वतीने या घटनेचा निषेध करण्यात आला. माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनीही पालिकेवर नाराजी व्यक्त केली. नगराध्यक्ष वहाडणे यांनी सोशल मीडियावर पोस्टमध्ये म्हटले आहे की, एक गाव एक गणपती ही संकल्पना पालिकेच्या,पोलीस विभागच्या वतीने अधिकारी कर्मचारी यांनी योग्य रीतीने पार पाडली.

विसर्जन संकलन केंद्रदेखील उत्कृष्ट रीतीने काम केले. पालिकेचे कर्मचारी पोहचण्याआधी कोणी तरी मुर्ती फेकल्या. ज्या व्यक्तींनी हा व्हिडिओ काढला. त्यांनी मुर्ती फेकणाऱ्या व्यक्तीला का अडवले नाही. त्यांनी केवळ व्हिडिओ काढण्यातच व पालिकेला बदनाम करण्यातच धन्यता मानली आहे.

दरम्यान या सर्व घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. मुर्तीफेकणाऱ्या व्यक्ती कोण आहेत. त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Video goes viral while throwing Ganesh idol in Kopargaon