चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्री ठाकरेंना क्रूरपणाचा सल्ला, भाजपच्या वहाडणेंचा घरचा आहेर

Vijay Vahadane criticizes Chandrakant Patil
Vijay Vahadane criticizes Chandrakant Patil

कोपरगाव ः कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हातमोजे, पीपीई किट घालून बाहेर पडावे, असे वक्तव्य करून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचे अवमूल्यनच केले आहे. हृदयविकाराची शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्तीला कोरोना प्रादुर्भाव जोखीम अधिक असतांना "मातोश्री" बाहेर पडण्याचा सल्ला देणे हा क्रूरपणाच आहे. आजपर्यंत झालेल्या प्रदेशाध्यक्षांची शानदार कारकीर्द पहाता असे वक्तव्य करून पाटील यांनी चूकच केली आहे, असा घरचा आहेर नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी दिला आहे.

प्रसिद्धीपत्रकात त्यांनी म्हंटले की, याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व देशवासियांना सोबत घेऊन करोना विरोधात लढणाऱ्या योद्धय्यांचा सन्मान, कृतज्ञता म्हणून घंटानाद, थाळीनाद हा उपक्रम यशस्वी केला. खासदार शरद पवार या विरोधी नेत्यानेही प्रतिसाद दिला. त्यानंतर देशवासियांना साद घालून देशभर दिवे उजळवून सर्व भारतीय एकजूट आहेत असे जगाला दाखवून दिले व जनतेचे मनोधैर्य वाढविले. त्याउलट महाराष्ट्र भाजपाने माझे अंगण, माझे रणांगण अशा संकुचित मानसिकतेच्या आंदोलनाची हाक देऊन समाजात काय संदेश दिला हेच कळत नाही.  

याच न्यायाने भारतात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढला, बळी गेले म्हणून विरोधकांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाविरुद्ध असेच आंदोलन करायचे का? अशा काळात आरोप्रत्यारोप करणे देशहितासाठी घातकच आहे, हे माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला कळते ते महाराष्ट्र भाजपाच्या महान नेत्यांना का कळू नये, अशी ही टीका वाहडणे यांनी केली आहे.

वहाडणे हे भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत. पक्षाने त्यांना डावलले तरी ते नरेंद्र मोदी विचार मंचाद्वारे सक्रिय आहेत. त्यांचे घराणे पूर्वीपासून पक्षाशी एकनिष्ठ आहे. पक्षनेत्यांनी काही चुकीची भूमिका घेतली तर ते मत व्यक्त करीत असतात. आताही त्यांनी हेच केले आहे. त्यांच्या टीकेची चर्चा सध्या जिल्ह्यासह राज्यात सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com