विखे पाटलांनी ऊसतोड कामगारांबाबत केलं ते दुसऱ्यांना जमेल काय?

सतीश वैजापूरकर
Saturday, 10 October 2020

आमदार विखे पाटील म्हणाले, ""यंदाच्या गळीत हंगामासमोर कोविड संकटाचे मोठे आव्हान आहे. त्यामुळे ऊसतोडणी मजुरांना विम्याचे संरक्षण देण्याचा निर्णय पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याने घेतला आहे.

राहाता : ""ऊसतोडणी मजुरांना विम्याचे संरक्षण कवच देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याने घेतला. इथेनॉल उत्पादन आणि साखरविक्रीचे दर निश्‍चित करण्याचे केंद्र सरकारने घेतलेले धोरण क्रांतिकारी आहे,'' असे प्रतिपादन आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. 

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना आणि गणेश सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ आमदार विखे पाटील यांच्या उपस्थितीत झाला. अध्यक्षस्थानी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के होते.

या वेळी गणेश कारखान्याचे अध्यक्ष मुकुंदराव सदाफळ, उपाध्यक्ष प्रतापराव जगताप, डॉ. विखे पाटील कारखान्याचे उपाध्यक्ष विश्वास कडू, भास्करराव खर्डे, बाळासाहेब भवर, नंदलाल राठी, पंचायत समिती सभापती नंदाताई तांबे, उपसभापती उमेश जपे, ऍड. रघुनाथ बोठे, ज्ञानेश्वर गोंदकर यांच्यासह कारखान्याचे अधिकारी उपस्थित होते. 

आमदार विखे पाटील म्हणाले, ""यंदाच्या गळीत हंगामासमोर कोविड संकटाचे मोठे आव्हान आहे. त्यामुळे ऊसतोडणी मजुरांना विम्याचे संरक्षण देण्याचा निर्णय पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याने घेतला आहे.

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या नावाने साखर कामगारांसाठी यापूर्वीच कारखान्याने योजना सुरू केली आहे. आता इथेनॉलच्या किमती निश्‍चित करतानाच, पाच वर्षांच्या दीर्घ मुदतीचे करार करण्यास परवानगी दिल्याने, साखर कारखान्यांना दिलासा मिळेल. केंद्र सरकारच्या नव्या धोरणामुळे साखर उद्योगाला स्थिरता मिळण्यास मदत होईल.'' 

मंदिरे उघडण्याचा निर्णय घ्यावा 
मंदिरे उघडण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनांचा, तसेच भाविकांच्या भावनांचा विचार करून सरकारने निर्णय करण्याची गरज आहे, कारण मंदिरे असलेल्या गावांतील अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे, असे आमदार विखे पाटील म्हणाले. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vikhe factory will provide insurance cover to sugarcane workers