
याबाबत माहिती देताना सचिव उध्दव देवकर म्हणाले, लिलावासाठी बाजार समितीचे दोन अधिकारी व तीन कर्मचारी तैनात केले होते. हमाली व तोलाई वगळता शेतक-यांच्या पट्टीत कुठलीही कपात नाही. शिवाय पैशाची हमी हे येथील सुत्र आहे.
राहाता ः अडत्यांना टाळून शेतक-यांच्या वाहनांजवळ जाऊन शेतमालाचा लिलाव करण्याची नवी पध्दत आजपासून येथील बाजार समितीत सुरू झाली. आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारातून झालेल्या या बदलास, पहिल्याच दिवशी व्यापा-यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
अडत्याचे दडपण व हस्तक्षेप नसल्याने सोयाबीनला सरासरी प्रतिक्विंंटल अडोतीसशे रूपये भाव मिळाला. त्यामुळे शेतकरी सुखावले. दिवसभरात पाचशेहून अधिक पोत्यांची आवक झाली. उत्तम प्रतिचे सोयाबीन 3 हजार 955 रूपये प्रतिक्विंटल दराने विकले गेले.
या पूर्वी शेतकरी त्यांच्या ओळखीच्या आडत्याच्या गाळ्यात शेतमाल उतरवतीत असत. त्यानंतर व्यापारी त्या गाळ्याजवळ जाऊन लिलाव करीत. त्यात ब-याचदा आडत्याला हस्तक्षेप करण्याची संधी मिळे. त्याचा हस्तक्षेप टाळून थेट शेतक-यांच्या शेतमालाचा लिलाव करण्याच्या सुचना आमदार विखे पाटील यांनी दिल्या. आज त्यास चांगला प्रतिसाद मिळाला.
एवढेच नाही तर अडत्यांनी त्यांची भूमिका बदलली आणि तेही व्यापा-यांसारखे खुल्या लिलावात खरेदीसाठी दाखल झाले. तुलनेत अधिक दर मिळाल्याने शेतक-यांनाही दिलासा मिळाला.
आज पोत्यामागे शंभर रूपयांनी दर वाढल्याने गावोगाव काटे मापे मांडून खरेदी करणा-या व्यापा-यांनादेखील आज शेतकऱ्यांना अधिक भाव द्यावा लागला.
मक्तेदारी कमी झाली आणि खुली स्पर्धा झाली तर शेतमालाला अधिक भाव मिळण्याची शक्यता वाढते. असे चित्र आज बाजार समितीती पहायला मिळाले. सभापती भाऊसाहेब बनकर व उपसभापती बाळासाहेब जपे यांच्या हस्ते नारळ फोडून या नव्या लिलाव पध्दतीस प्रारंभ झाला. यावेळी माजी सभापती बापूसाहेब आहेर, वाल्मिक गोर्डे व संचालक मंडळातील सदस्य उपस्थीत होते.
याबाबत माहिती देताना सचिव उध्दव देवकर म्हणाले, लिलावासाठी बाजार समितीचे दोन अधिकारी व तीन कर्मचारी तैनात केले होते. हमाली व तोलाई वगळता शेतक-यांच्या पट्टीत कुठलीही कपात नाही. शिवाय पैशाची हमी हे येथील सुत्र आहे.
अडत्यांच्या हस्तक्षेप दूर करून खुलेपणाने लिलाव झाले. त्यामुळे राहाता बाजार समितीत शेतक-यांच्या सोयाबीनला चांगला भाव मिळाला असे दिसते आहे. या लिलावात आणखी काही त्रुटी किंवा कमतरता वाटली आणि शेतक-यांनी काही सूचना केल्या तर आम्ही त्याचे स्वागत करू. यंदा सोयाबीनचे भाव वाढतील. असे जाणकारांचे मत आहे. त्याचा अंदाज शेतक-यांनी घ्यायला हवा.
- राधाकृष्ण विखे पाटील, आमदार, शिर्डीसंपादन - अशोक निंबाळकर