विक्रमसिंह पाचपुते म्हणतात, कोरोनापेक्षा आर्थिक संकट मोठे

संजय आ. काटे
Sunday, 9 August 2020

शहरात वाढती रुग्णसंख्या पाहता शहरातील व्यापारीपेठ बंद ठेवणे उचित ठरणार नाही. त्यामुळे ज्या भागात रुग्ण आढळून येतील तो भाग तेथील नागरिकांशी चर्चा करून बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घ्यावा.

श्रीगोंदे : तालुक्यात कोरोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता शहरातील व्यापारी पेठ बंद ठेवण्याऐवजी संबंधित रुग्णाचे घर अथवा परिसर सील करावा, असे मत विक्रमसिंह पाचपुते यांनी व्यक्त केले. 

आमदार बबनराव पाचपुते यांच्या सूचनेनुसार विक्रमसिंह पाचपुते यांनी आज व्यापारी वर्गाच्या उपस्थितीत श्रीगोंद्यात कोरोनाबाबत आढावा बैठक घेतली.

यावेळी ते म्हणाले, प्रशासनाने दाखविलेल्या तत्परतेने शहरातील कोरोनाची संख्या आटोक्यात येण्यास मदत झाली. कोरोनाबाबत प्रशासनाकडून चांगल्या पद्धतीने काम केले जात आहे, मात्र तरीही शहरासह तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे.

हेही वाचा - बातमी आहे जायकवाडीची...इतके टक्के भरलंय धरण

शहरात वाढती रुग्णसंख्या पाहता शहरातील व्यापारीपेठ बंद ठेवणे उचित ठरणार नाही. त्यामुळे ज्या भागात रुग्ण आढळून येतील तो भाग तेथील नागरिकांशी चर्चा करून बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घ्यावा. मात्र, समाजाला वेठीस धरण्याचे काम प्रशासनाकडून होऊ नये. त्यामुळे संबंधित रुग्णाचे घरच सील करण्यात यावे.

कारण कोरोनाच्या संकटापेक्षा येणारे आर्थिक संकट खूप मोठे असणार आहे. त्यामुळे आर्थिक संकटाला सामोरे जाण्यासाठी व्यापारीबाजार पेठ चालू ठेवून प्रत्येकाने सामाजिक अंतर व स्वतः ची सुरक्षितता बाळगली तर नक्कीच आपण कोरोनाला हद्दपार करू असा विश्वास पाचपुते यांनी व्यक्त केले.

यावेळी उपनगराध्यक्ष अशोक खेंडके, संदीप नागवडे, सुरेश भंडारी, राजु नय्यर, अनिल बगाडे, अशोक बगाडे, अमित बगाडे, विक्रम काळे, विशाल बगाडे, सुरेश शहा, अमोल दंडनाईक, नवनीत कटारिया, आनंद कटारिया उपस्थितीत होते. 

आमदार पाचपुते यांचे प्रशासनाला पत्र
शहरातील वाढत्या रुग्णसंख्येबाबत प्रशासन योग्य पाऊले उचलत आहे, पण व्यापारी पेठ बंद ठेवणे हा उपाय नाही. त्यामुळे व्यापारी पेठ चालू ठेवून ज्या भागात रुग्ण सापडेल तो भाग अथवा रुग्णाचे घर सील करण्याबाबत निर्णय घ्यावा असे पत्र आमदार पाचपुते यांनी तहसीलदारांना दिले आहे.
 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vikram Singh Pachpute says the financial crisis is bigger than Corona