
वन विभागाने नागरिकांची दिशाभूल केली असून, संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी नाऊर व जाफराबाद ग्रामस्थांनी केली आहे.
श्रीरामपूर (अहमदनगर ) : तालुक्यातील निमगाव खैरी शिवारातील दिघी चारी परिसरात लावलेल्या पिंजऱ्यात दोन दिवसांपूर्वी अडकलेला बिबट्या वन विभागाने नाऊर परिसरात जखमी अवस्थेत सोडून दिल्याचे समोर आले आहे. एका ठिकाणाहून जेरबंद केलेला बिबट्या केवळ चार किलोमीटरवर सोडल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. वन विभागाने नागरिकांची दिशाभूल केली असून, संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी नाऊर व जाफराबाद ग्रामस्थांनी केली आहे.
हे ही वाचा : राज्याचे सांस्कृतिक वैभव सरकारकडून दुर्लक्षित; साईचरित्र ग्रंथाला 90 वर्षे पूर्ण झाल्यामुळे शिर्डीत पूजन
निमगाव खैरी परिसरात लावलेल्या पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्यास अभयारण्यात सोडण्याऐवजी केवळ चार किलोमीटरवरील नाऊर परिसरात सोडल्याचे समोर आल्याने, वन विभागाच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित होत आहेत. नागरिकांची दिशाभूल करणारे वन अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्याकडे करणार असल्याचे बाळासाहेब नवगिरे यांनी सांगितले.
दरम्यान, याबाबत जाफराबाद येथील सरपंच संदीप शेलार यांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता, वन विभागाने उडवा-उडवीची उत्तरे दिली. निमगाव खैरी परिसरात अडकलेला बिबट्या जखमी अवस्थेत होता. त्यावर प्राथमिक उपचार करणे गरजेचे असताना, वन विभागाने त्याला जखमी अवस्थेत नाऊर परिसर सोडल्याने ग्रामस्थांनी सवाल उपस्थित केला आहे.
संपादन - सुस्मिता वडतिले