बोटीतून जाण्यासाठी १२ दुचाकी अन्‌ ३२ माणसांची परवानगी, पण फोटो पाहून तुम्हीच सांगा काय होईल

विलास कुलकर्णी
Saturday, 22 August 2020

मुळा धरण झाल्यानंतर वावरथ, जांभळी व जांभुळबन ही तीन गावे धरणाच्या पलीकडे गेली. ग्रामस्थांना धरणाच्या पाण्यातून यांत्रिक बोटीतून प्रवास करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी बोटीतून क्षमतेच्या निम्मे प्रवासी वाहतूक होणे अपेक्षित आहे. परंतु, बोटीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी व दुचाकी वाहने कोंबली जातात. कोरोना संक्रमण व बोट बुडण्याची भीती अशा दुहेरी संकटात प्रवाशांना नाईलाजाने जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.  

राहुरी (नगर) : मुळा धरणाच्या पलीकडील वावरथ, जांभळी, जांभुळबनच्या ग्रामस्थांना धरणाच्या अथांग पाण्यात यांत्रिक बोटीतून धोकादायक प्रवास करावा लागतो. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी बोटीतून क्षमतेच्या निम्मे प्रवासी वाहतूक होणे अपेक्षित आहे. परंतु, बोटीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी व दुचाकी वाहने कोंबली जातात. कोरोना संक्रमण व बोट बुडण्याची भीती अशा दुहेरी संकटात प्रवाशांना नाईलाजाने जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.  

मुळा धरण झाल्यानंतर वावरथ, जांभळी व जांभुळबन ही तीन गावे धरणाच्या पलीकडे गेली. ग्रामस्थांना धरणाच्या पाण्यातून यांत्रिक बोटीतून प्रवास करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. प्रवाशांच्या सोयीसाठी दोन बोटींची व्यवस्था आहे. पहिल्या मोठ्या यांत्रिक बोटीतून १२ दुचाकी व ३२ माणसांची वाहतुकीची क्षमता आहे. दुसऱ्या छोट्या लहान बोटीतून ८ दुचाकी व २० माणसे वाहतुकीची क्षमता आहे. छोटी बोट खूप गर्दी असेल तरच चालविली जाते. एरवी, मोठी यांत्रिक बोट चालविली जाते. 

वावरथ-जांभळी ग्रामपंचायतीने बोटीची निविदा प्रक्रिया करून, प्रति महिना २५ हजार ५०० रुपये भाडेतत्त्वावर बोट चालविण्याचा ठेका दिला आहे. बोटीत दुचाकीला १० रुपये व प्रति माणसी ५ रुपये भाडे आकारले जाते. स्वतंत्र बोट करायची असल्यास, १२० रुपये प्रति खेप भाडे आकारणी केली जाते. सकाळी आठ वाजता जांभळी ते बारागाव नांदूर व शेवटची परतीची बोट सायंकाळी सात वाजता बारागाव नांदूर ते जांभळी दरम्यान चालते. दिवसभरात दहा-बारा खेपा होतात. १५० ते २०० माणसे व शंभर ते सव्वाशे दुचाकी दररोज यांत्रिक बोटीतून प्रवास करतात.

ठेकेदार वेळेची बंधने पाळत नाही. गर्दी झाल्यावर बोट सोडली जाते. त्यामुळे बोटीत क्षमतेपेक्षा जास्त माणसे व दुचाकी कोंबली जातात. शेवटची परतीची बोट लवकर निघून जाते. त्यामुळे, बऱ्याच वेळा स्वतंत्र खेप करावी लागते. त्यासाठी, १२० रुपये भाडे ठरले आहे. परंतु, निर्धारित दरापेक्षा जास्त दर आकारणी होते. त्यामुळे, ग्रामस्थ वैतागले आहेत. ठेकेदार स्वतःच्या फायद्यासाठी ग्रामस्थांची लूट करीत असून, ग्रामस्थांचा जीव धोक्यात घालीत आहे. असे ग्रामस्थांचे आरोप आहेत.

जांभळी ग्रामपंचायतचे सरपंचा शकुंतला बाचकर म्हणाल्या, ठेकेदाराला मासिक भाडे तत्वावर यांत्रिक बोट चालविण्यास दिली आहे. ठेकेदार स्वतःच्या फायद्यासाठी बोटीचे वेळापत्रक पाळत नसेल. तर, त्याकडे लक्ष दिले जाईल. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या निर्बंधांनुसार क्षमतेपेक्षा निम्मे प्रवासी वाहतूक केली पाहिजे. प्रत्यक्षात तसे होत नाही. याबाबत ठेकेदाराला समज दिली जाईल.   .

संपादन -  सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The villagers in Rahuri taluk have to travel dangerously by boat in the water

Tags
टॉपिकस
Topic Tags: