
उपोषणाची तारीख जवळ येऊ लागल्याने राळेगणसिद्धीच्या नागरिकांत व हजारे यांचे चाहते चिंताक्रांत झाले आहेत.
राळेगणसिद्धी (अहमदनगर) : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे वय ८३ असून उपोषणाची तारीख जसजशी जवळ येऊ लागली तशी राळेगणसिद्धी परिवार व हजारे यांच्या चाहत्यांचे मन चिंताक्रांत झाले आहे. या वयात अण्णांनी उपोषण न करता मौन व धरणे आंदोलन करावे, अशा भावना राळेगणसिद्धीतील ग्रामस्थांतून व्यक्त होत असून त्यासाठी मंगळवारी (ता. २६) प्रजासत्ताक दिनी ग्रामसभा घेऊन राळेगणसिद्धी परिवाराच्यावतीने अण्णांना विनंती केली जाणार आहे.
अहमदनगरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा
शेतक-यांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी हजारे यांनी राळेगणसिद्धी येथे महात्मा गांधी पुण्यतिथीपासून (ता. ३० जानेवारी) यांनी केंद्र सरकारच्या विरोधात अखेरचे उपोषण आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. स्वामिनाथन आयोगानुसार शेतीमाला हमीभाव मिळावा, केंद्रिय कृषीमूल्य आयोगाला स्वायत्तत्ता मिळावी, यासह इतर मागण्यांसाठी हजारे यांचे हे आंदोलन आहे. भाजपचे नेते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी राळेगणसिद्धीला भेट देऊन केलेली शिष्टाई निष्फळ ठरली. उपोषणाची तारीख जवळ येऊ लागल्याने राळेगणसिद्धीच्या नागरिकांत व हजारे यांचे चाहते चिंताक्रांत झाले आहेत.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
शेतक-यांच्या हितासाठी मागण्या असल्याने जिद्दी स्वभाव असलेले अण्णा हजारे त्यासाठी जीवाची बाजी लावायला मागे हटणार नाहीत. या वयात उपोषणाने हजारे यांच्या प्रकृतीस्वास्थ्यावर परिणाम होण्याचा धोका असल्याचे येथील नागरिक तसेच डॉ. दौलत पोटे, डॉ. रामदास पोटे, डॉ. धनंजय पोटे यांनी सकाळशी बोलताना सांगीतले. आता हजारे यांचे मन कोणी व कसे वळवायचे हा प्रश्न ग्रामस्थ व त्यांच्या चाहत्यांना सतोवतो आहे. त्यासाठी प्रजासत्ताक दिनी सायंकाळी येथील संत यादवबाबा मंदिरात ग्रामसभा घेऊन अण्णांनी उपोषणाऐवजी मौन किंवा धरणे आंदोलन करावे, असा ठराव मंजूर करण्यात येणार आहे.
तसेच अण्णांनी उपोषण न करण्याची विनंती राळेगणसिद्धी परिवाराच्या वतीने केली जाणार असल्याची माहिती माजी सरंपच जयसिंग मापारी, माजी उपसरपंच लाभेश औटी, उद्योजक सुरेश पठारे, दादा पठारे, भागवत पठारे, सुनिल हजारे, दत्ता आवारी, शरद मापारी यांनी दिली. राळेगणसिद्धी व परिसरातील सोशल मिडीयातही हजारे यांच्या उपोषणाविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. हजारे यांनी केलेल्या शेतक-यांच्या मागण्या योग्य असल्याने केंद्र सरकारने त्याची दखल घेत प्रश्न मार्गी लावावेत, अशी मागणी होत आहे.
अण्णा हजारे यांनी उपोषण केले तर त्यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे (डिहायड्रेशन मुळे) व ग्लुकोजचे प्रमाण कमी होऊ शकेल. या वयात त्याचा गंभीर परिणाम रक्ताभिसरण संस्था, चेतासंस्था, किडनी, मूत्रसंस्था या शरीरांतर्गत अवयांवर होईल. हे एकूणच त्यांच्या शरीरस्वास्थ्यासाठी अतिशय धोकायदायक ठरू शकेल.
- डॉ. हेमंत पालवे, एम. डी. (अण्णा हजारे यांचे खाजगी डॉक्टर)