वाडिया पार्क नगरकरांसाठी खुले पण, खेळाडूंमध्ये नाराजीच

अमित आवारी
Wednesday, 16 December 2020

लॉकडाउन जाहीर झाल्यापासून नगर शहरातील वाडिया पार्क (जिल्हा क्रीडा संकुल) मैदान बंद होते.

अहमदनगर : लॉकडाउन जाहीर झाल्यापासून नगर शहरातील वाडिया पार्क (जिल्हा क्रीडा संकुल) मैदान बंद होते. हे मैदान आजपासून सुरू करण्यात आले. मात्र हे मैदान सर्वांसाठी खुले करण्यात आलेले नाही. हे मैदान सुरू करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी नियम व अटी लावल्या आहेत.

कंटेनमेंट झोन वगळता नॉन रेड झोनमध्ये क्रीडा संकुल, स्टेडियम आणि इतर सार्वजनिक मोकळ्या जागांना वैयक्तिक व्यायामासाठी सामाजिक अंतराच्या निकषांचे पालन करुन खुले ठेवणेस परवानगी दिली आहे. प्रेक्षक वा सामुहिक जमावाला परवानगी दिलेली नाही. त्यानुसार, जिल्ह्यातील कंटेनमेंट झोन वगळता नॉन रेड झोन मध्ये क्रीडा संकुले, स्टेडियम आणि इतर सामुहिक जमावाला परवानगी असणार नाही. शारिरीक व्यायाम व इतर व्यवहार, कृती, क्रिया यासाठी सामाजिक अंतराच्या निकषांचे पालन करणे बंधनकारक राहील असे आदेश जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी दिले आहेत. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
त्यानुसार आजपासून जिल्हा क्रीडा संकुल, स्टेडियम आणि इतर सार्वजनिक मोकळ्या जागा हे प्रेक्षक वा सामुहिक जमावाला वगळून फिरण्यासाठी व शारिरीक व्यायामासाठी सकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत व सायंकाळी 4 ते 9 या कालावधीत सामाजिक अंतराच्या निकषांचे पालन करुन खुले ठेवण्यात आले आहे. शारिरीक व्यायाम व इतर व्यवहार, कृती, क्रिया करतांना सामाजिक अंतराचे पालन करावे व संकुलात प्रवेश करण्यापूर्वी व संकुलातून बाहेर जातांना मास्कचा तसेच सॅनिटायझरचा वापर केलेला असावा.

संकुल समितीने निश्‍चित केलेली प्रवेश फीची रक्‍कम भरुन व प्रवेश पास सोबत असेल तरच संकुलात प्रवेश दिला जाईल. सराव झाल्यानंतर गर्दी न करता वेळेत संकुल परिसरातून बाहेर पडावे. संकुलातील प्रवेश व वापराबाबतच्या अटी संकुलाच्या प्रवेशद्वाराजवळ व दर्शनी भागात लावण्यात आलेले आहेत. त्याचे अवलोकन होवून त्यानुसारच खेळाडू व नागरिकांनी शिस्तीचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांनी केले आहे.

क्रीडा संघटनांत नाराजी
जिल्हा क्रीडा संकुलात नागरिकांना प्रवेश देण्यात आला असला तरी क्रीडा संघटनांना खेळाडूंसाठीचे सराव घेण्यास मात्र मान्यता देण्यात आलेली नाही. त्यामुळे क्रीडा संघटनांत नाराजी आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wadia Park in the Nagar city is open to the public